सांगली : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विकासकामांसाठी ६३२ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५९ कोटी २८ लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सोमवारी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे आदींसह वरिष्ठ अधिकारी, विशेष निमंत्रित सदस्य प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा, यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकासकामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा. प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. पावसाळा संपताच कामांचे कार्यादेश दिले जातील, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले.
यावेळी लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी मांडलेल्या मौजे मरळनाथपूर, रेठरे धरण (ता. वाळवा) व गोरक्षनाथ येथील निसर्ग पर्यटन विकास मंडळाचा आराखडा, वीर शिवा काशिद स्मारक, गुहागर – विजापूर महामार्गालगतचे जोडरस्ते महामार्गाला व्यवस्थित जोडले जाणे, कुंडल येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचा प्रस्ताव, बिरोबा देवस्थान आरेवाडीच्या पर्यटन विकासाचा आराखडा, मिरज येथे एम्स रुग्णालय, शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग, नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम व सदस्थितील वर्ग खोल्यांची दुरुस्ती, पूरपरिस्थिती नियंत्रण, अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेची कारवाई, नंदादीप प्रकल्पाअंतर्गत जत तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील दूध भेसळ, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.