अजित पवार गटातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. याच कारणामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे तसेच छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, गुरुवारी (२२ फेब्रुवारी) छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा अडवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ते मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना आपला दौरा आवरता घ्यावा लागला. यावरच आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आता स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. मग ताफा अडवण्याचे कारण काय? भुजबळ कुटुंबाने शिवसेनेत काम केलेले आहे. आम्ही कोणालाही घाबरणारे नाही, असे यावेळी भुजबळ म्हणाले. ते आज (२३ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलले होते.

“स्वतंत्र मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा”

“पंकज भुजबळ यांची गाडी का अडवण्यात आली, हे आंदोलकांनाच माहिती. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनच भूमिका होती. ती भूमिका सरकारने पार पाडली आहे. माझ्यासहित सर्वांनी या वेगळ्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तेव्हादेखील मी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister chhagan bhujbal criticize manoj jarange patil and maratha activist for opposing son pankaj bhujbal tour of malegaon prd
First published on: 23-02-2024 at 12:37 IST