Chhagan Bhujbal on Plane Technical Snag : धुळे विमानतळावर मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात काल (१८ फेब्रुवारी) तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. परिणामी छगन भुजबळ रस्तेमार्गे शिर्डीला पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर विमानातील तांत्रिक बिघाडाकडे गांभीर्याने पाहिलं जातंय. दरम्यान, नेमकं काय झालं होतं? यावर छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. मुंबईहून धुळ्याला विमानाने आलो. त्यानंतर धुळ्याहून शिर्डीला विमानाने येऊन येवल्याला याचं होतं. विमानात आम्ही सर्व बसलो, विमानाचे दोन्ही इंजिन सुरू झाले आणि धावपट्टीवर जाऊन विमान उड्डाण घेणार तेवढ्यात डॅशबोर्ड्सवरील स्क्रिन्स बंद दिसेल”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“नशिबाने मध्येच कुठेतरी ते बंद स्क्रीन बंद झाले असते तर लँडिंगला अडचण झाली असती. पण ताबडतोब उड्डाण रद्द करण्यात आलं. मग आम्ही रस्त्याने येवल्याला पोहोचलो. इंजिन आहे, मशिन आहे, त्यात अडचण निर्माण होत असतात”, असं भुजबळ म्हणाले.
पुरावे असतील तर द्या
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी शंका उपस्थित केली. यावर छगन भुजबळ म्हणाले, “कोणीही कितीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की ज्यांच्याकडे शंका, पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणा माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल.”

