शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ( २६ मार्च ) मालेगावात जाहीर सभा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मालेगावात ठाकरे गटाची पहिलीच सभा आहे. तसेच, मालेगावचे आमदार मंत्री दादा भुसे हे देखील शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यावर दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे. ते 'टीव्ही ९ मराठी'शी बोलत होते. "मालेगावच्या सभेसाठी अनेक पक्ष बदलून ठाकरे गटात आलेले काही लोक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातून गर्दी गोळा करण्यात येत आहे. याचा अर्थ नेत्याचा मालेगावच्या जनेतवर विश्वास नाही," असा टोला भुसेंनी ठाकरे गटाला लगावला आहे. हेही वाचा : “…तेव्हापासून उद्धव ठाकरे टोमणे मारायला लागले”, शंभूराज देसाईंचा टोला, म्हणाले, “घालून-पाडून…” "लोकशाहीत ज्याला त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात मत मांडत असताना काही पातळीपर्यंत टीका करण्याचे अधिकार आहेत. पण, संजय राऊत खोट बोलत जनतेची दिशाभूल करत आहेत. मालेगावच्या जनतेला आम्ही काय आहोत, ते माहिती आहे. जनता याला बिलकुल थारा देणार नाही. ते जर जास्तीच खोटं बोलले, तर उत्तर सभा आम्ही सुद्धा घेऊ," असा इशारा दादा भुसेंनी ठाकरे गटाला दिला आहे. "बोलणाऱ्यांपेक्षा जनतेला काय वाटतं, हे जास्त महत्वाचं आहे. जनता या गोष्टीला कंटाळली असून, थारा देत नाही. विकास, जनतेची सुख-दु:ख या गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त दोन दिवसांसाठी या गोष्टी करून चालत नाही. हजारो लाखो शिवसैनिकांनी कष्ट केले आहेत. सामान्य झोपडीतील शिवसैनिकाने जनतेची सेवा केली. त्यांच्या जिवावर शिवसेना उभी आहे. नेत्याच्या बाजूला चमचेगिरी करून शिवसेना उभी राहत नाही," असेही दादा भुसेंनी म्हटलं आहे. हेही वाचा : “शिंदेंच्या सभेला ३०० रुपयांत माणसं आणतात”, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले, “सभा सुरू झाल्यावर…” "मालेगावच्या सभेने या लोकांची…" मालेगाव सभेबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. "उद्धव ठाकरेंच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे. तुम्ही कितीही अपप्रचार करा. सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणार आहेत. लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याने काही होणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं, तर मालेगावच्या सभेने या लोकांची हातभर फाटलीय," असं संजय राऊतांनी सांगितलं.