गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप होत आहेत. गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने काही नेत्यांवर कठोर कारवाई केली असून संबंधित नेते तुरुंगात आहेत. अनेक नेत्यांच्या घरांवर, कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी केली जात आहे. असं असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी राज्यातील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात असं त्यांनी म्हटलं आहे. टक्केवारी मागणाऱ्या मंत्र्याची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. संबंधित मंत्री मतदार संघाच्या कामातून देखील पैसे मागतात. मंत्र्यांना आर्थिक मोबादला दिला तरच ते मतदारसंघासाठी निधी देतात, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. जैस्वाल यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर जैस्वाल यांनी असे आरोप केल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आपण महाविकास आघाडी सरकारने ठरवलेल्या उमेदवारालाच मतदान करणार असल्याचं आमदार आशिष जैस्वाल यांनी म्हटलं आहे. जर कुणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आम्हाला ऑफर देऊन बघावे, आम्ही मुक्कामाच्या तयारीनेच जात आहोत, असंही जैस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे.

जैस्वाल यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारल असता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, “निवडणुकींमुळे छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांना आणि अपक्षांच्या भुमिकांना धार येते. पण जैस्वाल हे शिवसेनेचेच आहेत. ते नाराज नाहीत,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मंत्री आमदाराकडे टक्केवारी मागतात ही बाब भीषण असून हे वसूली सरकार आहे, अशी टीका भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.