जिल्ह्यात पीक पैसेवारी ५०पेक्षा कमी आल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला. दोन महिन्यांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता आणखी कोणा शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी राज्य सरकारने वेळीच आर्थिक मदत करावी, नसता मंत्र्यांना जिल्हाबंदी करून १५ दिवसांत भव्य रुमणे मोर्चा काढला जाईल. ठोस मदत मिळाल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून शेतकरी हलणार नाही, असा इशारा खासदार राजीव सातव यांनी दिला.
जिल्ह्यात कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप पीक गेले. आता रब्बी पिकाचीही आशा उरली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी खासदार सातव, आमदार संतोष टारफे, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. शहरातून घोषणा देत मोर्चा जात असताना १५ मिनिटे जोरदार पाऊस बरसला. पावसात भिजतच मोच्रेकरी चालत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. सातव, टारफे, गोरेगावकर, संजय बोंढारे, अ. हफीज या मोजक्या मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ५ शेतकऱ्यांना सभेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यापुढे आत्महत्या करणार नाही अशी शपथ घ्या. हक्कासाठी आपला लढा चालूच राहील, असे सातव यांनी या वेळी शेतकऱ्यांना सांगितले. सोयाबीन, कापूस, पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीजबिल माफ करावे. गुरांच्या छावण्या तात्काळ सुरू कराव्यात. पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात. मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोहयोंतर्गत कामे सुरू करावीत, ५० टक्के पीक पैसेवारी आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. राजीव सातव, गोरेगावकर, डॉ. टारफे, संजय बोंढारे, प्रकाश थोरात, शंकर कऱ्हाळे, सदाशिवराव जटाळे, प्रकाश देशमुख आदींच्या त्यावर सहय़ा आहेत.