Girish Mahajan Statement : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. मंत्री महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडला. मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करीत एक महिला कर्मचारी संतप्त झाली. या महिला कर्मचाऱ्याने महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला कर्मचारी वन विभागात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “एखादं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर एवढा गोंधळ कशासाठी घालायचा? मी जाणीवूपर्वक अर्वाच्च किंवा उलट सुलट बोललो नव्हतो. पण नाव राहिलं म्हणून एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती. नाव राहिलं म्हणून मी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. त्यांचा विचार जोपासणारा माणूस आहे. मला वाटतं यावर हा विषय थांबवला पाहिजे होता. पण अॅट्रोसिटी दाखल करा असं म्हणणं चुकीचं आहे.”

गिरीश महाजन यांनी भाषणात काय म्हटलं होतं?

मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन कार्यक्रमावेळी भाषण केले. गेल्या काही वर्षांतील आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाले आहेत. कुंभमेळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभाग समन्वयाने कामे प्रगतीपथावर आहेत. नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ विकसित करण्यात येत असून, यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ६५ किलोमीटरचा बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रस्तावित असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका संबंधित महिला कर्मचाऱ्याने मांडली. “ ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतले नाही. ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.” असा पवित्रा संबंधित महिलेने घेतला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजपा आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.