सोलापूर : बहुप्रतीक्षित सोलापूर विमानसेवेचे लोकार्पण करताना केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, सोलापूर-गोव्यानंतर येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर-मुंबई विमानसेवाही निश्चितपणे सुरू होणार असल्याची ग्वाही दिली. सुमारे १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरच्या विमानसेवेस सोमवारी ‘फ्लाय ९१’ कंपनीमार्फत गोव्याच्या माध्यमातून प्रारंभ झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ बोलत होते. सोलापूरच्या विमानतळावर झालेल्या या समारंभात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वागत केले. मात्र, पहिल्याच दिवशी पाऊस आणि खराब हवामानामुळे या विमानसेवेला दोन तास विलंब झाला.

या विमानसेवेचे लोकार्पण सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. त्यासाठी ते मुंबईत सांताक्रूझ विमानतळावर सोलापूरकडे विशेष विमानाने रवाना होण्यासाठी सकाळी ७.३० वाजता येऊन थांबले होते. परंतु, पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना सोलापूरकडे रवाना होण्यासाठी हिरवा कंदील मिळत नव्हता. दहा वाजेपर्यंत हीच प्रतिकूल परिस्थिती होती. त्यामुळे फडणवीस यांना सोलापूरला येता आले नाही. दरम्यान, खराब हवामानामुळे पुण्याहून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही सोलापुरात विशेष विमानाने दाखल होण्यास विलंब झाला. तसेच गोव्यापून ४१ प्रवाशांना घेऊन येण्यासाठी सज्ज झालेले विमानही खराब हवामानामुळे उड्डाण करण्यास पावणे दोन तास उशीर झाला. सकाळी ७.२० वाजता गोव्यातून उड्डाण होणारे विमान प्रत्यक्षात सकाळी १०.०५ वाजता सोलापूरकडे जाण्यासाठी आकाशात झेपावले. त्यानंतर सकाळी ८.३० वाजेऐवजी सकाळी ११.२५ वाजता विमान सोलापूर विमानतळावर दाखल झाले. त्यापाठोपाठ मोहोळ यांचेही विशेष विमान पोहोचले. इकडे, या विमानसेवेच्या लोकार्पणाचा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे एक हजार नागरिक विमानतळावर हजर होते. सर्वांना विमानसेवा सुरू होण्याची उत्सुकता होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लक्ष घातल्यामुळे सोलापूर विमानसेवा सुरू झाली, याचा आवर्जून उल्लेख केला. सोलापूरहून गोव्यासाठी मागणी नसतानाही विमानसेवा सुरू झाली. पण खरी मागणी मुंबई विमानसेवेसाठी होती. त्याप्रमाणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केल्याशिवाय मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर सोडू नये, असा प्रेमाचा आग्रह पालकमंत्र्यांनी केला. त्यास प्रतिसाद देत मोहोळ यांनी मुंबईसाठीची विमानसेवा येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची ग्वाही दिली. ‘फ्लाय ९१’ विमान वाहतूक कंपनीचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खराब हवामानामुळे येऊ शकले नसल्याने भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षाभंग झाला. यावेळी आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटील, राजू खरे यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.