मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. झिरवाळ यांच्याकडील पदभार काढून घ्या. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करा. लाच घेणाऱ्यांना कार्यमुक्त करून त्यांना मूळ अस्थापनेत परत पाठविणे, ही कारवाई होऊ शकत नाही. सरकार झिरवाळ यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप केला. सभापतींनी मागणीची दखल न घेतल्यामुळे घोषणाबाजी करून विरोधकांनी सभात्याग केला.
सतेज पाटील यांनी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. सभापतींनी आपल्या दालनात स्थगन प्रस्ताव नाकारला होता. पण, सभागृहात बोलण्याची संधी दिली होती. पाटील यांनी संधी साधत झिरवाळ आणि सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.
मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजू ढेरेंगे याला लाच घेताना अटक करण्यात आली. मुळात मंत्रालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कोणतीही कारवाई करावयाची असेल तर गृह मंत्रालयाला माहिती द्यावी लागते. गृह मंत्रालयाची पूर्व परवानगी घेतल्यानंतरच अशा प्रकारची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला करता येते. त्यामुळे ही कारवाई गृहमंत्रालयाच्या सांगण्यावरून झाली का. झिरवाळ यांना अडचणीत आणण्यासाठी ही कारवाई केली गेली का. की, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग स्वंतत्रपणे काम करतो, हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
या प्रकरणी फक्त दोषींनी कार्यमुक्त करून, त्यांना मूळ अस्थापनेत पाठविणे, ही कारवाई होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडील पदभार काढून घ्यावा, तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही. किमान त्यांच्याकडील खात्याचे कार्यभार अन्य मंत्र्यांकडे द्यावा. सरकारने झिरवाळ आणि दोषींना पाठिशी घालू नये, अशी मागणी केली. पण, सभापतींनी विरोधकांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही – झिरवाळ
मंत्री नरहरी झिरवळ आपल्या कार्यालयातील लाच प्रकरणीशी आपला संबंध नाही. मी त्यावेळी दिल्लीत होतो. लाच घेतलेल्या राजू ढेरेंगेला अन्न आणि औषध प्रशासन विभागातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. खासगी सचिव रामदास गाडे यांना मूळ विभागात परत पाठविले आहे. चौकशीत या प्रकरणाशी माझा संबंध दिसून आला तर स्वतःहून राजीनामा देईन, अशी घोषणा झिरवाळ यांनी केली. त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे झिरवाळ यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

