केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापुरात एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी अचानक त्यांना भोवळ आली. परंतु त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना सावरले. त्यानंतर तात्काळ वैद्यकीय पथक धावून आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वर्धापन दिन कार्यक्रमाचा सोहळा आयोजित केला होता. आज (गुरूवार) त्या सोहळ्याचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

गुरूवारी नितीन गडकरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विद्यापीठातील कार्यक्रमाच्या समारोपादरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रगीतादरम्यान त्यांना भोवळ आली. दरम्यान, त्यांना भोवळ आल्यानंतर त्यांना त्यांच्या अंगरक्षकाने सावरले. त्यानंतर तात्काळ वैद्यकीय पथकाने धाव घेतली. त्यानंतर त्यांना औषध देण्यात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळ विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतली. नंतर ते सोलापूर शहरातील पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. यापूर्वी शिर्डीतल्या सभेत गडकरी यांना भोवळ आली होती. ते बोलत असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. त्यावेळी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात राहुरीमध्येही नितीन गडकरींना चक्कर आली होती. त्यावेळीही त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली होती.