राहाता : जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या निष्क्रियतेवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे संतप्त होत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाला सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगत, उपाययोजनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याची तयारी आहे.

वनविभागाने आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रियतेवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विखे यांनी जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांच्याकडून घेतली. जिल्ह्यात १ हजार १५० बिबटे असल्याचा अंदाज आहे. मात्र, यापैकी २५ बिबट्यांना पकडण्यात यश आले आहे.

मात्र, वनविभागाच्या हलगर्जी पणावर विखे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात ३५० पिंजरे लावले आहेत. ४ थर्मल ड्रोन्स् ४ ‘ट्रॅक्युलायझेशन गन’ आणि २५० ‘ट्रॅप कॅमेरे’ जिल्ह्यात कार्यान्वित केले असले तरी बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे. जिल्ह्यातील वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बैठकीत अधिकचे उपाय करण्याबाबत प्रशासनाने निर्णय केले असले तरी वनविभागाने आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रियतेवर विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील घटनांचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. जिल्ह्यासाठी २२ रेस्क्यू वाहन, अतिरीक्त पिंजरे ‘ट्रॅक्युलायझेशन गन’ तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ड्रोनद्वारे स्थळ निरीक्षण करण्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू. मात्र, वनविभागाने प्रस्ताव तरी पाठवले पाहिजेत, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.