scorecardresearch

अजित पवार म्हणाले ‘त्यांनी दारुची दुकानं उघडली,’ आता संदिपान भुमरेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले ” ते आम्हाला…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

sandipan bhumre criticizes ajit pawar
संदिपान भुमरे, अजित पवार (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मंत्री संदीपान भुमरे मागील काही दिवसांपासून एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल करत आहेत. मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी ९ दारूची दुकाने उघडली, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. त्यानंतर आता संदीपान भुमरे यांनीदेखील आक्रमक पवित्रा करत अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार यांनी कितीही टीका करावी. मात्र २०२४ मध्ये महायुतीतेच सरकार येणार. त्यांनी आम्हाला गद्दारीविषयी सांगू नये. सकाळी पहाटे उठून ते कोठे गेले होते, कोणी गद्दारी केली, हे सर्वांनाच माहिती आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले. ते आज (१२ फेब्रुवारी) सिंधुदुर्गमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले…

अजित पवार यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही

“अजित पवार यांच्याकडून मला तशी अपेक्षा नव्हती. ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आम्ही त्यांना सत्तेतून पायऊतार केलेले आहे. म्हणूनच ते आमच्यावर अशी टीका करत आहेत. त्यांनी कितीही टीका केली तरी २०२४ साली महायुतीचीच सत्ता येणार आहे. आमचे ४० लोक फुटले म्हणत अजित पवार यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ते पहाटे उठून कोठे गेले होते. ते आम्हाला गद्दार म्हणू शकत नाहीत. कारण पहाटे कोणी गद्दारी केली, ते सर्वांनाच माहिती आहे,” अशी खोचक टीका संदीपान भूमरे यांनी केली.

हेही वाचा >>> कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच संभाजीराजेंचा नव्या राज्यपालांना मोलाचा सल्ला, म्हणाले “ज्या चुका…”

अजित पवार काय म्हणाल होते?

अजित पवार ११ फेब्रवारी रोजी पैठण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पैठणमधील एका सभेला संबोधित करताना संदीपान भुमरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. “पैठण तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, रुग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण, मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ९ दारूची दुकाने उघडली. दुकानासमोर गतिरोधक बसवलं. का तर… गाडी थांबावी आणि गिऱ्हाइकाने थांबत टाकून जावं… उलट लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा जवळ गतिरोधक बसवतो. मात्र, या पद्धतीने स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवता. कुठे फेडाल हे पाप…तळतळात लागेल,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 16:51 IST