MPSC आंदोलनामुळे चर्चेत आलेला विद्यार्थी विवेकानंद पाटील हा मूळचा कोल्हापूरमधल्या राधानगरीचा आहे. विवेकानंद पाटीलचं घर अतिशय साधं, पत्र्याचे आणि मातीच्या भिंतींचे आहे. मात्र या घराचा फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कारण मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी देखील विवेकानंद पाटीलच्या घराचा व्हिडीओ एक्सवर टाकत कौतुक केले आहे. एवढंच नाही तर त्याच्या घरात असलेल्या फोटोचा उल्लेख करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काय आहे उदय सामंत यांची पोस्ट?

सोशल मीडियावर आज एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडिओ दिसला. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो बघून आनंद झाला. स्वामी विवेकानंद म्हणायचे,” “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते.” विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही त्यांच्या घरातील पारितोषिकांनी माझ्या मनाला अधिक समाधान दिलं. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभं आहे, एवढीच हमी या निमित्तानं देतो. अशी पोस्ट उदय सामंत यांनी केली आहे. तसंच विवेकानंद पाटील याच विद्यार्थ्याचं त्यांनी कौतुक केलं आहे.

कोण आहे विवेकानंद पाटील?

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील माजगावचा विवेकानंद मारूती पाटील याने त्याच्या भाषणाच्या खास शैलीने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. एमपीएसी आयोगाचे वाभाडे काढत तो आपल्या खास कोल्हापुरी शैलीत जे ठसकेबाज भाषण करतो त्यामुळे लाखो तरूणांकडून त्याचं कौतुक होतं आहे. विवेकानंद पाटील याने कुरूकली येथील भोगावती महाविद्यालयातून दोन वर्षांपूर्वी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विवेकानंद पाटीलने MPSC च्या अभ्यासाला सुरूवात केली होती. आत्तापर्यंत त्याने दोनदा ही परीक्षा दिली आहे. मराठी भाषेवर त्याची चांगली पकड आहे. तसंच आपल्या भाषणात तो कवितांचे दाखलेही देतो, शेरोशायरीही म्हणतो. त्यामुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. MPSC चं आंदोलन त्याने त्याच्या भाषणांनी गाजवलं आहे यात शंकाच नाही. विवेकानंद पाटीलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विवेकानंद पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची बहीणही एमपीएससी तयारी करते आहे.

सोशल मीडियावर विवेकानंद पाटील चर्चेत

MPSC च्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनात आलेला हा कोल्हापूरचा विद्यार्थी मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आपल्या भाषणाची खास पद्धत, उपस्थितांना आकर्षून घेण्याची त्याची शैली ही चर्चेचा विषय ठरली आहे