Yogesh Kadam : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोलीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या राज्यमंत्री पदाबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी बोलताना मंत्री योगेश कदम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं’, असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.

योगेश कदम काय म्हणाले?

“जवळपास ५० वर्षांनंतर दापोली मतदार संघाला मंत्रिपद मिळालेलं आहे. ५० वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे अर्थातच ५० वर्षांची उणीव ही लगेच भरून काढता येत नाही. त्यासाठी अनेक योजना, आताही आपल्या अनेक योजना कार्यरत आहेत. त्या राबवल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत”, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

“योगायोग चांगला आहे की राज्यमंत्री पद माझ्याकडे आहे. पण कदाचित मी हट्ट केला असता तर मला कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं असतं. मात्र, मी राज्यमंत्री स्वत: मागवून घेतलं. कारण मला माहिती होतं की कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं तर कोणतंही एकच खातं मिळालं असतं आणि तेही कोणतं खातं मिळेल याची काही खात्री नव्हती”, असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

“पण जर राज्यमंत्री पद घेतलं तर चांगले खाते मिळू शकतात. राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात आणि आपल्या कोकणात अनेक गोष्टी आपण करू शकतो. माझ्याकडे शहरी गृहराज्य खातं आहे, तसेच महसूल खातं आहे, ग्रामविकास खातं आहे. अन्न नागरी पुरवठा खातं आहे. महसूल खातं आणि ग्रामविकास ही महत्वाची खाती आहेत. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत”, असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.