राहाता: सहकाराच्या राजकारणात मातब्बर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले दुसरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, हे दोन्ही मंत्री राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व आहे. दोघेही आठ वेळेस विधानसभेवर सातत्याने प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचे राजकीय कसब नावाजलेले आहे. ‘जलसंपदा’अंतर्गत खेळांच्या स्पर्धेच्या आखाड्यात या दोन्ही मंत्र्यांनी आपले कसब आजमावत परस्परांना ‘पाणी पाजण्याचा’ प्रयत्न केला.

स्पर्धेच्या उद्घाटना निमित्ताने दोन्ही मंत्र्यांनी फलंदाजी व गोलंदाजी केली तसेच बुद्धीबळाच्या पटावरही काही चाली खेळत कौशल्याची चुणूक दाखवत आम्ही या क्षेत्रातही कमी नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याला उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी खेळाडूंनी मनापासून दाद दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या तीन दिवशीय स्पर्धांचे उद्घाटन आज, शनिवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त खेळाडू व सध्या प्रशासनात कार्यरत असलेले पंकज शिरसाठ, अक्षय आव्हाड व श्वेता गवळी यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द दोन्ही मंत्र्यांनी केवळ औपचारिक हजेरी न लावता क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगचे कौशल्य आजमावले. राधाकृष्ण विखे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळात सहभागी होत, हातात बॅट घेऊन फलंदाजी केली तर गिरीश महाजन यांनी गोलंदाजी केली. महाजन व विखे यांनी या निमित्ताने जलसंपदा विभागातील खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

बुद्धीबळाच्या पटावरही मंत्री विखे व महाजन यांनी चाली खेळत एकमेकांना शह देत कौशल्याची चुणूक दाखवली. भविष्यात विखे व महाजन यांची राजकीय चाल कशी असेल याची चर्चा या निमित्ताने उपस्थितांमध्ये रंगली. पण यावर दोन्ही मंत्र्यांनी राजकीय भाष्य जाणीवपूर्वक टाळले असले तरी गिरीश महाजन यांनी मी संकट मोचक असल्याने राज्यातील चांगल्या व वाईट घटनांमध्ये मलाच प्रत्येक ठिकाणी पाठवले जाते, त्यामुळे मी प्रत्यक्ष पोहोचून काम करतो, कारण मी सातत्याने व्यायाम करत असतो. काम करायला मनगटातही दम लागतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला, मी सकाळी जिममध्ये व्यायामाला गेल्याने कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

यावेळी मंत्री महाजन आणि मंत्री विखे यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते. निरोगी आयुष्यासाठी खेळाची नितांत गरज आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळून प्रशासनात शिस्त व आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.