सांगली : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास दोषी ठरवत विशेष न्यायालयाने गुरुवारी १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुधारीत बाल अत्याचार कायद्यांतर्गत एखादा अल्पवयीन मुलास अशा प्रकरणात शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

सांगली जिल्ह्यातील तुंग गावी  एका शाळकरी मुलीवर अत्याचार  करून तिचा खून करण्यात आला होता.  गुन्ह्याच्या तिसऱ्याच दिवशी  १६ वर्षे आठ महिने वयाच्या संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने या मुलीवर अत्याचार आणि तिचा गळा दाबून खून केल्याची  कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी  न्यायालयात दाखल केलेला वैद्यकीय आणि ‘डीएनए’चा अहवाल ग्राह्य मानण्यात आला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. न्यायालयाने या प्रकरणी संशयित मुलास दोषी ठरवत १२ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक कलमान्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुधारीत बाल अत्याचार कायद्यांतर्गत एखादा अल्पवयीन मुलास अशा प्रकरणात शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्याने गुन्ह््याचा तपास करणे, न्यायालयात प्रकरण उभे करणे आव्हानात्मक होते. सुधारीत कायद्यामुळे पीडित मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळू शकला, अशी प्रतिक्रिया सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी व्यक्त केली.