बीड : बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमनुसार होणाऱ्या कार्यवाहीच्या संदर्भात वारंवार जनजागृती, समुपदेशन केले जात असतानाही बालविवाह थांबलेले नाहीत. दहावीचा पेपर सुरू असतानाच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला.
पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा गावात दाखल होईपर्यंत बालविवाह उरकला होता. अधिकाऱ्यांना पाहून लग्नाच्या मांडवातून सर्वजण फरार झाले. या प्रकरणी नवरदेवासह त्याचे आई-वडील, चुलता, नवरीचे आई-वडील, दोघांचे मामा, मंडपवाले, छायाचित्रकार, लग्न लावणारे पंडित, आचारी या १३ मुख्य आरोपींसह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीचा सोमवारी गणिताचा पेपर होता. मात्र तिला परीक्षेला जाऊ न देता तिचा विवाह लावण्यात आला.