जात पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमकाल संघटनेची मागणी

धानोरा तालुक्यातील मोहली येथे इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मोहली गाव पंचायतीने १२ हजार रुपये दंड व गावाला बकऱ्याच्या मटणाचे भोजन देण्याची शिक्षा ठोठावली. मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या आरोपीकडून मटण पार्टी घेणाऱ्या या जात पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भूमकाल संघटनेने आज येथे पत्रकार परिषदेतून केली आहे. एखाद्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर बकऱ्याच्या गावभोजनाचा दंड हा किळसवाण्या मानसिकतेचा प्रकार असल्याची टीका होत आहे.

पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहली येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता पाचव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला आरोपी अनिल मडावी याने १७ जानेवारीला तिच्या आईला बरे वाटत नसल्याचे सांगून शिक्षकांची परवानगी घेऊन शाळेतून नेले. यानंतर गाव तलावाकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर १८ जानेवारीला मोहली येथे जात पंचायत बोलावण्यात आली. या जात पंचायतीत सरपंच गावडे, उपसरपंच बागू पदा, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रोहिदास पदा तसेच माडिया गोंड समाजातील इतर नागरिक उपस्थित होते. जात पंचायतीच्या निर्णयानुसार आरोपी अनिल मडावी याला १२ हजार रुपये दंड व गावाला बकऱ्याच्या मटणाचे जेवण देण्याची विचित्र शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानुसार आरोपीने गाव जेवण दिले. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांना दंडाची रक्कम दिली नाही. पीडित मुलीची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जात पंचायतीचा सल्ला घेतला. मात्र, जात पंचायतीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने पोलीस पाटील नंदा नलचुलवार यांच्याशी संपर्क साधून धानोरा पोलीस ठाण्यात २४ जानेवारीला आरोपी अनिल मडावी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली. मात्र, यामध्ये जात पंचायतीचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. हा प्रकार भूमकाल संघटनेला माहिती होताच त्यांनी मोहली गाव गाठून चौकशी केली. हे प्रकरण समोर रेटण्यासाठी वूमेन्स अगेन्स सेक्शुअल व्हॉयलंस तसेच मानवाधिकार व इतर आदिवासी, महिला संघटनांनी समोर येऊन या प्रकरणाला उचलून धरावे, आदिवासी भागात जुन्या परंपरा व गावातील भांडण गावातच सोडवण्याच्या नावाखाली महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे दाबली जातात. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्यावी, मोहली येथील प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जात पंचायतीमधील लोकांना सहआरोपी करण्यात यावे, या प्रकरणाला जात पंचायत प्रकरण म्हणून पहावे आणि सुधारित एफआयआरमध्ये जात पंचायत कायद्यांतर्गत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, महिला आयोगाने एक स्वतंत्र समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी भूमकालच्या प्रा.डॉ. रश्मी पारसकर, प्रा. दीपाली मेश्राम, जितेंद्र श्रीरामे यांनी आज येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.