अलिबाग : सातारा जिल्ह्य़ातील कोळसा भट्टी मालकाच्या तावडीतून सुधागड तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात सर्वाहारा जनआंदोलन ला यश आले आहे. अंजना वालेकर व नितेश पवार अशी त्यांची नावे आहेत. आईवडीलांच्या अंगावर पैसे असल्याने या दोन्ही मुलांना ५ महिन्यांपासून अडकवून ठेवण्यात आले होते. पोलीसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली.

    रायगड जिल्ह्यतील सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव रोजगारासाठी राज्यातील विविध भागात स्थलांतरीत होत असतात, काम पुर्ण झाल्यावर ते गावाकडे परतत असतात. याच प्रमाणे गायमाळ नेणवली येथील दोन कुटूंब ही सातारा जिल्ह्यतील सोनवडी येथे कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी गेले होते. यात नामदेव वालेकर त्यांची पत्नी अनुसया मुलगी अंजना तसेच गौरू पवार त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगा नितेश  यांचा समावेश होता. . भट्टीवरील काम आटोपल्यानंतर ही दोन्ही कुटुंबे पुन्हा आपल्या घराकडे परत निघाली. परंतु त्यावेळी या दोन्ही कुटुंबांच्या अंगावर मालकाचे पैसे निघाले. त्यामुळे त्यांची दोन मुले अंजना व नितेश यांना कोळसा भट्टी मालक हसन शेख व अहमद शेख यांनी थांबवून ठेवले.

ही दोन्ही मुले मागील ५ महिन्यांपासून कोळसा भट्टी मालकांच्या ताब्यात होती.  तिथं ती शेळ्या राखणे तसेच पोल्ट्री फार्मवर काम करीत होती. या संदर्भात नामदेव वालेकर यांनी २३ मार्च रोजी सर्वाहारा जनआंदोलनच्या उल्का महाजन यांच्याकडे तRार केली. उल्का महाजन , सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून दुधे यांनी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काईंगडे यांना सूचना देवून याची चौकशी व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी याबाबत फलटण पोलिसांना कळविले. . फलटण पोलिसांनी सोनवडी गावात जावून या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.

 या मुलांना सातारा बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. २७ मार्च रोजी सर्वाहारा जनआंदोलनचे अध्यक्ष सोपान सुतार व चंद्रकांत गायकवाड यांनी अंजना हिच्या आईवडीलांसह सातारा इथं जावून तिला ताब्यात घेतले. तर नितेशचे आईवडील नसल्याने बालकल्याण समितीने त्याला आपल्या ताब्यात ठेवले आहे.