आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे-विदर्भाचे प्रतिनिधीत्व करत होते. पण आता काँग्रेसचे नितीन राऊत, सुनील केदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे सरकारमध्ये नागपूरचे-विदर्भाचे प्रतिनिधी आहेत. नागपूरचे-विदर्भाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्ही कुठलेही राजकारण न करता, त्यांच्यापाठिशी ठामपणे उभे राहू असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

ते लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्ग या नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. विदर्भातील मिहान प्रकल्पामध्ये २८ हजार जणांना नोकरी लागली. त्यांच्या नावाची यादी माझ्याकडे आहे. आता राफेल फायटर विमान, १२ आसनी विमान बनवणाऱ्या फाल्कन कंपन्या मिहानमध्ये येतील. आता कामठी, कनाल, चंद्रपूर, गडचिरोलीमधून युवक नोकरीसाठी मिहान प्रकल्पामध्ये येतात.

टीसीएस, इन्फोसिस अशा कंपन्या सुद्धा आणण्याची गरज आहे. आंतररष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर रोजगार आणखी वाढेल. नागपूरच्या विकासाबरोबर इथल्या तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे असे नितीन गडकरी म्हणाले. नागपूर मेट्रोचा सध्याचा प्रतिकिलोमीटरचा खर्च ३५० कोटी आहे. ब्रॉडगेज मेट्रो झाल्यानंतर प्रतिकिलोमीटर खर्च चार कोटी होईल. रेल्वेने ब्रॉडगेज मेट्रोला मान्यता दिली आहे. ही कल्पना आपल्याच डोक्यातून निघाल्याचेही गडकरी म्हणाले.