Mira Road Security Guard Attack: मुंबईत मीरा रोड परिसरात एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकू हल्ला करणारा व्यक्ती कट्टरपंथी असल्याचा संशय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तपासात हल्लेखोराच्या निवासस्थानी काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याचेही फडणवीस यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.

चाकू हल्ल्यानंतर अटक

“जिहादच्या नावाखाली संशयिताला इतर धर्मीय नागरिकांवर हल्ला करायचा होता”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. अमेरिकेतून परतलेल्या ३१ वर्षीय तरुणाला सोमवारी चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी अटक केली. मीरा रोड येथे दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याप्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास ठाणे विभागाच्या दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. ‘कलमा’ बोलण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी संशयित हल्लेखोर कट्टरपंथी असल्याचा संशय व्यक्त केला. “हा व्यक्ती कट्टरपंथी असल्याचे दिसते, त्याच्या राहत्या घरातून काही आक्षेपार्ह पुस्तकं आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तो अमेरिकेत राहत होता अलिकडेच तो माघारी परतला आहे. तो कट्टरपंथी झालाय आणि जिहादच्या नावाखाली इतर धर्मातील सदस्यांवर हल्ला करत आहे. त्यातून ही घटना घडल्याचे दिसते,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सखोल तपास होणार

“याप्रकरणाचा तपास सध्या दहशतवादी विरोधी पथक करत असून यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची देखील मदत घेतली जात आहे. या तपासातून असे आणखी कोणी कट्टरपंथी झालेत का? यामागे कोण आहे का? याचा शोध घेतला जात आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार दोन्ही तपास यंत्रणांना संपूर्ण सहाकार्य करत आहे. यामागे काही मोठा कट आहे का किंवा नेटवर्क आहे का? याचा शोध घेतला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नेमकं घडलं काय?

सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी अन्सारी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासांत अटक केली. संशयिताने नया नगर, मीरा रोड येथे राजकुमार मिश्रा आणि सुब्रोतो सेन यांच्यावर हल्ला केला. संशयित १९ वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर २०१९ मध्ये भारतात परतला आहे. सध्या या घटनेचा तपास केला जात असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे.