लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : महायुतीमधून जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे या जागांची आग्रही मागणी करण्यात आली आहे. तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेत केले.
जनसुराज्य शक्ती पक्ष, सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटप करण्यात आले. त्या वेळी आ. कोरे बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, मिरजेचे माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-शाळकरी मुलांच्यात वाढता दृष्टिदोष!
या वेळी आ. कोरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी चांगले काम केले आहे. जनसुराज्य शक्ती हा महायुतीतील भाजपचा मित्र पक्ष आहे. लोकसभेवेळी एकाही जागेची मागणी आमच्या पक्षाने भाजपकडे केलेली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जत व मिरज या दोन मतदारसंघांची जागा आम्हाला मिळावी, असा आमचा आग्रह आहे. या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी नोंदवली असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन आ. कोरे यांनी केले.
आणखी वाचा-फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
मिरज शहरातील विकासकामासाठी मित्र पक्षाच्या कोट्यातील निधींची उपलब्धता करण्यात आली. याबद्दल आ. कोरे व प्रदेशाध्यक्ष कदम यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी पक्षाच्या शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. जिल्हाप्रमुखपदी आनंद पुजारी, शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ. पंकज म्हेत्रे, युवा शहर जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ रोहिले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.