कर्जत: अहिल्यानगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड मालमोटारी व कंटेनरमधून डिझेल चोरी करणारी टोळी मिरजगाव पोलिसांनी जेरबंद केली. दोन वाहनांसह १५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जशील करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांनी ही माहिती दिली.
भगवान गोवर्धन पठारे (वय ४०, सालेवडगाव, आष्टी, बीड) सुनील प्रमोद श्रीवास्तव (वय ४०, मूळ रा. खांडवानाका, तेजाजीनगर, इंदोर मध्यप्रदेश, सध्या रा. सालेवडगाव) गणेश नवनाथ दहातोंडे (वय २०, सालेवडगाव) व आकाश दत्तू मोरे (वय ३५, नांदगाव, नाशिक, सध्या रा. निमगाव चोभा बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून एक स्कॉर्पिओ, एक स्विफ्ट मोटार, तीन मोबाईल, ४० लिटर क्षमतेचे रिकामे ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे पाईप, तीन लोखंडी कोयते, दोन मिरचीच्या पुड्या, एक रस्सी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मिरजगावमधून जातो. या महामार्गावर अवजड, लांब पल्ल्याची वाहने विश्रांतीसाठी व जेवणासाठी धाब्यावर थांबतात. याचा गैरफायदा गुन्हेगार घेतात व मालमोटार, कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीचे गुन्हे घडतात. कधी महामार्गावर वाहने आडवून चालकांना मारहाण करून लूटण्याचेही प्रकार घडतात. या संदर्भात कर्जत, जामखेड व मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत काहीवेळेस ४००-५०० लिटर डिझेल चोरीला जाऊनही वाहनचालक परराज्यातील असल्याने पोलिसांकडे तक्रार दिली जात नसे.
याला पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नाकाबंदी व रात्रीचे गस्त वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झांजड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डिझेल चोरीच्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पोलिस अंमलदार राजेंद्र गाडे व अशोक रक्ताटे ही रात्रीची गस्त घालताना त्यांना एक संशयास्पद स्विफ्ट मोटार व स्कॉर्पिओ भरधाव वेगाने जाताना निदर्शनास आली. त्यांनी मोटरीचा पाठलाग केला मोटर मिरजगावपासून ३ किमी अंतरावर तिखी गावच्या शिवारात मराठवाड्याकडे जाणाऱ्या मिरजगाव-कडा रस्त्यावरील एका वीजवाहक खांबावर आदळली.
मोटारीतील तीन संशयित व्यक्ती पसार झाल्या. नंतर पोलिसांनी स्कॉर्पिओचा पाठलाग केला तीही आष्टीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरली. स्विफ्ट मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये डिझेल चोरीचे साहित्य, कोयते आढळले. त्यानुसार पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याच्या तयारीचा व प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मोटर सोडून पसार झालेल्या वरील चौघांना अटक करण्यात आली. त्यांनी जामखेड, कर्जत व मिरजगाव परिसरात केलेल्या १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या कारवाईमध्ये पोलिस अंमलदार गणेश ठोंबरे, सुनील खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, बळीराम काकडे, नितीन शिं,दे राहुल गुंडु यांनी सहभाग घेतला.
