गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासनांच्या गाळात रुतलेल्या मिरकरवाडा मत्स्य बंदराचे दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. याच वेळी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नादुरुस्त यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करणे, जयगड-निवळी रस्त्याचे रुंदीकरण आदी कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.
दरम्यान, माजी राज्यमंत्री भास्कर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती योग्य असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद निश्चितच वाढेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मला आनंदच वाटेल, असेही सामंत म्हणाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली निवड अभिनंदनीय असून त्यांचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तत्पूर्वी त्यांनी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती करून घेतली. रत्नागिरी शहरालगतच्या मिरकरवाडा मत्स्य बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या डिसेंबरपासून निश्चितच सुरू होईल, असे सांगून या बंदराच्या परिसरातील दहा हेक्टर जागा सध्या महसूल खात्याकडे असून येत्या आठवडय़ात या जागेचे रीतसर हस्तांतरण मत्स्य व्यवसाय विभागाकडे करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच बंदरालगत असलेले अतिक्रमणही मच्छीमारांनी काढून टाकले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत मत्स्य व्यवसाय खात्याचे आयुक्त जैन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही केली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना अत्यावश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागाही यथावकाश भरण्यात येतील. तसेच रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीचे संबंध ठेवून रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जयगड येथे सुरू झालेल्या जिंदाल कंपनीच्या औष्णिक प्रकल्पामुळे जयगड ते निवळी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक वाढली असून त्यामुळे लहान-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु या रुंदीकरणास काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता. आता हा रस्ता ४५ मीटरऐवजी ३० मीटर रुंद करण्यात येणार असून त्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे नुकतेच आले आहे. त्यानुसार आता या रस्त्याचे ३० मीटर एवढे रुंदीकरण करण्यात येणार आहे. शिवाय १२ ठिकाणी प्रत्येकी एक मीटर याप्रमाणे सव्‍‌र्हिस रोडचे काम केले जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आपण करणार असून पालकमंत्रिपदाचा वापर करताना जिल्ह्य़ाच्या विकासाबाबत माझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा पक्ष विचारात न घेता नि:पक्षपणे काम करणार आहे. असेही ते म्हणाले.