रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील जे. के. फाईल स्टॉपपासून चिरायू हॉस्पिटलकडे जाणाऱ्या बायपास मार्गाची पावसाच्या सरींनी अक्षरशः चिखलवाट झाली आहे. पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचून मोठमोठी डबकी तयार होत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची दुरवस्था डोळ्यांसमोर असतानाही संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या  यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

चिरायू हॉस्पिटलकडे जाणाऱ्या या बायपास मार्गावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी प्रभावी निचरा व्यवस्था नसल्याने पावसाची सर आली की रस्त्याचा काही भाग चिखलाने माखतो. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून, पादचाऱ्यांना चिखल तुडवत जाण्याची वेळ येत आहे. वाहनांची ये-जा सुरू असताना चिखलाचे पाणी अंगावर उडण्याचे प्रकारही घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

या मार्गाच्या कामाशी संबंधित रवी इन्फ्रा बिल्ड या ठेकेदार कंपनीकडून पाणी आणि चिखलाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी परिस्थिती जैसे थे ठेवली जात असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपयांची कामे होत असताना मूलभूत पाणी निचऱ्याची व्यवस्था सक्षम नसेल, तर कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पावसाळ्यात नागरिकांचा त्रास संपेपर्यंत प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या समस्येत आणखी भर पडली आहे ती मोकाट गुरांच्या वाढत्या वावराची. परिसरात गुरांचे कळप रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. बायपासने गेल्यास चिखल आणि पाण्याची डबकी, तर महामार्गावरून गेल्यास रस्त्याच्या मधोमध बसलेली गुरे—वाहन चालवायचे तरी कसे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येण्याची शक्यता असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो.

त्यामुळे केवळ बायपासवरील चिखल हटवून किंवा डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही. प्रभावी पाणी निचरा व्यवस्था उभारणे, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आणि मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे, या तिन्ही बाबींवर संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या महामार्गाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी आहेत. रस्त्याला खड्डे आणि चिखल असल्याने जीव धोक्यात घालून गाडी चालवावी लागते. याकडे संबधितांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. – संतोष पिळणकर, मी-या रत्नागिरी.