शिर्डीत टिक- टॉक अॅपसाठी व्हिडिओ तयार करताना गावठी कट्ट्याचा वापर करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. व्हिडिओ अपलोड करताना गावठी कट्ट्यातून गोळी सुटून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

शिर्डीत राहणारा प्रतीक वाडेकर हा बाहेरगावी शिक्षण घेत होता. एका नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. प्रतीक व अन्य तीन जणांनी हॉटेल पवनाधाम येथे खोली घेतली होती. मंगळवारी संध्याकाळी प्रतीक, सनी पवार आणि अन्य दोघे जण खोलीत टिक टॉक अॅपसाठी व्हिडिओ शूट करत होते. सनी पवारच्या हातात गावठी कट्टा होता. व्हिडिओ अपलोड करत असताना सनीच्या हातातील कट्ट्यातून गोळी सुटली आणि ती समोर बसलेल्या प्रतीक वाडेकरच्या छातीत घुसली. प्रतीक गंभीर जखमी झाल्याचे पाहून सनी व अन्य दोघे जण हॉटेलमधून पळाले होते. हॉटेलमालकाने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली होती.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांना खबरीमार्फत माहिती मिळाली की घटनेनंतर आरोपी शिर्डी रेल्वे स्टेशनलगत लपून बसलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी लपून बसलेला तरुण सनी पोपट पवार (वय २०) यास अटक केली. यानंतर नितीन वाडेकरलाही पोलिसांनी अटक केली.