शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ( २६ मार्च ) मालेगावात जाहीर सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गटाची मालेगावात पहिलीच सभा होत आहे. तसेच, मालेगावचे आमदार मंत्री दादा भुसे हे देखील शिंदे गटात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या सभेवर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. 'टीव्ही ९ मराठी'शी बोलताना बच्चू कडू म्हणाले, "सभेनं वातावरण आणि लोकांची मन बदलतात, असं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्याही सभा खूप मोठ्या होत असत. पण, मनपरिवर्तन होण्यासाठी अनेक वर्षे गेली. २० वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली. जमिनीवर शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहावं लागतं. सभा घेतली आणि तेथील लोकांनी दुसरा आमदार निवडून दिला, असं थोडीच होतं. लोक एवढी मुर्ख राहिली आहेत का?," हेही वाचा : “मालेगावच्या सभेत जास्तच खोटं बोलले, तर…”, दादा भुसेंचा ठाकरे गटाला इशारा "गर्जनेपेक्षा काम महत्वाचं आहे. कोणाची पोट भरली गर्जनेनं? इथे मंदिर बांधा, तिथे मस्जिद बांधा. तिथले भोंगे काढा, इथले भोंगे राहुद्या… हे काय देशाचे प्रश्न नाहीत. रोज भुकबळीने लोक मरत आहेत. औषधउपचाराची व्यवस्था नाही. कष्टकरी, शेतकरी यांचे हाल काय आहेत?," असेही बच्चू कडूंनी म्हटलं. "लोक एवढे मुर्ख राहिले नाहीत. झेंडा बदलला म्हणून लोक प्रवाहात वाहून जातील, असं नाहीये. लोकांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न आहेत. नाशिकला आल्यावर द्राक्ष आणि कांद्याचे विषय असू शकतात. कांद्याला भाव नाही भेटला तरी चालेल. पण, मस्जिदीवरील भोंगा बंद झाला पाहिजे, हे कोण ऐकणार?," असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : ” २००९ ला मला निवडणूक लढवू दिली असती तर..” पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर "मालेगावच्या सभेने या लोकांची…" मालेगाव सभेबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. "उद्धव ठाकरेंच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे. तुम्ही कितीही अपप्रचार करा. सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणार आहेत. लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याने काही होणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं, तर मालेगावच्या सभेने या लोकांची हातभर फाटलीय," असं संजय राऊतांनी सांगितलं.