Rajendra Shingane Joins NCP Sharad Pawar : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. लवकरच जागावाटपही जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पक्ष प्रवेश आज मुंबईत शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे अजित पवारांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉ.राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चाही होती. याच अुनुषंगाने डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत मतदारसंघातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आपण पुढचा निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आज अखेर डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.
माजी मंत्री आणि आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा सिंदखेडराजा मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला होता
काही दिवसांपूर्वी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे अजित पवारांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला होता.