राज्यात आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये पून्हा हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा एकदा त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. जे केंद्र उमेदवारांनी निवडली आहेत, ते केंद्र न देता दुसरे लांबचे केंद्र कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारी यंत्रणेबाबत प्रचंड नाराजी दिसून येत आहे. शिवाय, परीक्षेत दोनदा गोंधळ झाल्याने संतापाची भावना देखील निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपा राज्य सरकार विरोधात आक्रमक झाला आहे, भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या मुद्द्य्यावरून राज्य सरकावर निशाणा साधला आहे.

“एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय.” असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, “काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने कोणतीही, कसलीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केली. करोनाच्या काळात विद्यार्थी कसेबसे परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यांना तिथून त्यांनी माघारी पाठवलं. सरकारी भरतीच्या परीक्षेत सावळा गोंधळ घालायची सवयच या सरकारला लागलेली आहे. ”

“ आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोनदा गोंधळ झालाय ; साहेब…, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना! ”

तसेच, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यांनी सहावेळा पुढे ढकलली. विद्यार्थी या सगळ्या परिस्थितीत मानसिक तणावाखाली आलेले आहेत. परंतु, याचं कसलंही, कोणतही गांभीर्य सरकारला अजिबात नाही. प्रशासन व सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही.” अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे.

याचबरोबर, “पुन्हा नव्याने होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सरकारने पुन्हा गोंधळ घातला आहे. एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवत आहात. विद्यार्थ्यांचा अधिकार तुम्ही नाकारता आहात. त्यांची संधी तुम्ही नाकरत आहात. हे वसूली सरकार मुळात नोकरभरती करत नाही, आणि केलीच तर त्यामध्ये सावळा गोंधळ घालत आहे. यांच्या गलथान कारभारामुळे, यांच्या नाकर्तेपणामुळे, स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तरी देखील हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय. ” असं देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेले आहेत.