किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने आज ( २ जून ) तिथीप्रमाणं शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिंदे सरकारवर टीकास्र डागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जे रायगडावर गेले, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही, तर महाराष्ट्रात कशाला राहता. चालते व्हा,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना…”, नितेश राणेंचं आव्हान

“तेव्हा सनातनी मनुवाद्यांनी तुम्ही शुद्र आहात…”

“छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक हा ६ जून १६७४ रोजी पार पडला. उत्तरेतून आलेल्या गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. पण, तेव्हा सनातनी मनुवाद्यांनी तुम्ही शुद्र आहात, राज्यभिषेक करण्याचा अधिकार नाही, असं महाराजांना सांगितलं,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी…”

“शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ६ जून २०२४ ला ३५० वर्ष होतात. मात्र, आज २ जून २०२३ ला राज्याभिषेक करण्यात आला. कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली? सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची मोडतोड करायची आहे का? सगळ्या धर्माचा आणि राज्याभिषेकाचं वाटोळं करणार आहात का?,” असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : “अरे टिल्ल्या तुझ्यात हिंमत असेल तर…”, अमोल मिटकरींचा अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर हल्लाबोल

“महाराष्ट्राचा इतिहास धुळीस मिळवला”

“तुम्हीच शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता. परंतु, आज महाराष्ट्राचा इतिहास धुळीस मिळवला. जे रायगडावर गेले, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तुम्हाला महाराजांचा इतिहास माहिती नाही, तर महाराष्ट्रात कशाला राहता. चालते व्हा… हा शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान आहे,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jitendra awhad angry on shinde govt shivrajyabhishek raigad ssa
First published on: 02-06-2023 at 20:14 IST