सेनेलाच माहीत नाही की, ते विरोधी पक्षात आहेत की सत्तेत. कोठे आहे विरोधी पक्ष? ठामपणे कोणी बोलायलाच तयार नाही. भाजप नेते चॅनेल बदलावे तसे शिवसेनेची भूमिका बदलवतात. कधी त्यांना सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात ठेवले जाते. लोकशाहीला सक्षम विरोधी पक्षाची गरज असते. विरोधी पक्षनेतेपद मिरवायचे असेल तर केंद्रातील युतीतून बाहेर पडावे, असे मत आमदार निलेश राणे यांनी येथे व्यक्त केले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पाच दुष्काळी गावांची पाहणी केल्यानंतर राणे पत्रकार बैठकीत बोलत होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेगळे बोलत आहेत आणि गीते वेगळीच माहिती सांगत आहेत. मुंबई व औरंगाबाद मनपांतील युती तोडावी लागेल ही भीती दाखवून भाजप नेते शिवसेनेला खेळवत आहेत. असे सांगत आमदार राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. एमआयएमचे नेते देशाच्या एकजुटीस धोका असून लोकशाहीत त्यांना निवडून दिले जात असेल तर त्यांनी त्यांची भाषा बदलली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने आमदार राणे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. दुष्काळातील शेतकऱ्यांची गरज लक्षात यावी आणि विधिमंडळात या अनुषंगाने सरकारकडे मागणी करताना अथवा टीकाटिप्पणी करताना मदत व्हावी, म्हणून दुष्काळी दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आले नाहीत, असे लक्षात आणून देताच, ही माहिती पक्षाच्या वरिष्ठांना सांगू, असे ते म्हणाले. मी एक पाऊल पुढे आहे. मला समजून घ्यायचे होते म्हणून आलो, असे सांगत त्यांनी जिल्ह्य़ातील पाच गावांमधील स्थितीचे वर्णन केले. दुष्काळ भीषण असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करायला हवी, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे बोलत, त्यावर आता त्यांनी उपाययोजना करावी, असेही ते म्हणाले. औरंगाबाद तालुक्यातील टाकळीवैद्य, कन्नड तालुक्यातील शेलगाव, खुलताबाद तालुक्यातील ममदापूर, गदाना या गावांना भेटी दिल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रमोद राठोड यांची उपस्थिती होती.