राज्यात काही ठिकाणी करोनामुळे बिकट अवस्था झाली आहे. विशेषतः मुंबईतील स्थिती गंभीर असून, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रुग्णानं हॉस्पिटलमधील स्थिती सांगितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही,” असं म्हटलं आहे.

मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही ४८९ वर पोहोचली आहे. मुंबईतील स्थितीवर केंद्राचं विशेष लक्ष असून, केंद्रानं पथक नियुक्त केलं आहे. मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत आहे. विशेष म्हणजे या रुग्णाच्या बाजूला एक मृतदेह पडलेला असून, तो उचलण्यास सांगितल्यानंतर डॉक्टर त्याच्यावर ओरडल्याचा आरोप या तरुणानं केला आहे. त्याचबरोबर सकाळपासून कुणीही नीट तपासणी करायला आलेलं नसल्याचं डॉक्टरनं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. “शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. ५० दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय?,” असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

करोनाग्रस्तांचा आकडा १२ हजारांच्या पुढे

मुंबईतील बधितांची संख्या १२ हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबईत शनिवारी ७२२ नवीन रुग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ४८९ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ७०० च्या वर रुग्ण सापडत आहेत, तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. शनिवारी ७२२ रुग्ण वाढल्यामुळे बाधितांची संख्या १२,६८९ वर गेली आहे, तर आणखी ६५२ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी २७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १६ महिला तर ११ पुरुष आहेत, तर १५ रुग्ण ६० वर्षांखालील आहेत.