scorecardresearch

आमदार नितीन देशमुख यांची चौकशी; बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची मंगळवारी लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या येथील विभागीय कार्यालयात अडीच तास चौकशी करण्यात आली.

आमदार नितीन देशमुख यांची चौकशी; बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप
आमदार नितीन देशमुख

अमरावती : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची मंगळवारी लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या येथील विभागीय कार्यालयात अडीच तास चौकशी करण्यात आली. यावेळी ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर सरकारच्या तसेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नितीन देशमुख यांना एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. नितीन देशमुख हे शेकडो कार्यकर्त्यांसह अमरावतीत दाखल झाले.

देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करीत अकोल्यातील एका व्यक्तीने एसीबीच्या कार्यालयात ही तक्रार दिली आहे. ही माहिती नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. तक्रार करणारा हा अकोल्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, लुटमारीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. या तक्रारदाराला अकोल्यातील भूखंड माफिया, म्हणजे अकोल्याच्याच शिवसेनेच्या माजी आमदाराचा पाठिंबा आहे. याबरोबरच शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचा देखील पाठिंबा असल्याचे देशमुख म्हणाले. तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ध्वनिफीत आपल्याकडे आली आहे, एसीबीला तक्रारदारासंदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे, असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ध्वनिफीत माध्यमांसमोर ठेवली जाईल. असेही देशमुख म्हणाले.

भाजपच्या एकाही व्यक्तीवर ‘ईडी’ची कारवाई नाही
आतापर्यंत राज्यात ‘ईडी’कडून फक्त मराठी माणसांवर कारवाया झाल्या. भाजपच्या लोकांनी आतापर्यंत अब्जावधी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. जवळपास ३५० च्यावर लोकसभा खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, १ हजारांवर त्यांचे आमदार आहे. परंतु, यातील एकाही व्यक्तीवर आतापर्यंत ‘ईडी’ असो ‘एसीबी’ असो, कारवाई झाली नाही. यांची किती संपती आहे, कुठून आणला यांनी एवढा पैसा, असे प्रश्न नितीन देशमुख यांनी उपस्थित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 02:44 IST

संबंधित बातम्या