MLA Parinay Fuke sister-in-law Priya’s Allegations : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की त्यांची सून तथा परिणय फुके यांच्या धाकट्या भावाची बायको (संकेत फुके यांची पत्नी प्रिया फुके) मला नातवंडांना भेटू देत नाही. त्याबदल्यात ती पैशांची मागणी करतेय. यावर प्रिया फुके यांनी कोणतंही भाष्य केलं नव्हतं. मात्र, आज शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर प्रिया फुके यांनी सुषमा अंधारे व रोहिणी खडसे यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सासरकडच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रिया फुके म्हणाल्या, “मी गेल्या दिड वर्षांपासून लढतेय. पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारतेय, मुख्यमंत्र्यांपासून राज्याच्या राजकारणातील माझ्या अनेक भावांना भेटले, अनेकांकडे मदत मागितली. मात्र कोणीही माझ्यासाठी उभं राहिलं नाही. मात्र, आज सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे या माझ्या दोन बहिणी माझ्यासाठी पुढे आल्या आहेत.
प्रिया फुके यांचा आरोप काय?
संकेत फुके यांच्या पत्नी म्हणाल्या, “फुके घराण्यातील सर्वात धाकटे पुत्र संकेत फुके यांच्याशी माझं २०१२ मध्ये लग्न झालं होतं. २०२२ मध्ये माझ्या पतीचं निधन झालं. मात्र, आमच्या कुटुंबाची फसवणूक करून ते लग्न झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षे आधी संकेत फुके यांच्यावर किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आम्हाला त्याची कल्पना दिली नव्हती. लग्नानंतर काही महिन्यांनी मला याची माहिती मिळाल्यावर मी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते मला म्हणाले, “बाहेर कोणाला याबाबत बोललीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला इजा पोहोचवली जाईल. घाणेरड्या पद्धतीने मला धमक्या दिल्या. बलात्कार करण्यासाठी तुझ्या घरी माणसं पाठवू अशी धमकी देखील दिली गेली”.
प्रिया फुके म्हणाल्या, “संकेत फुके यांच्या निधनानंतरही मला त्रास दिला जात होता, मला धमक्या दिल्या जात होत्या. संपत्तीवरून वाद होत होते. त्यातच एके दिवशी रात्री १०.३० वाजता त्या लोकांनी (सासरकडच्या मंडळींनी) मला घराबाहेर काढलं. आजही ते लोक मला त्रास देतायत. माझ्या घरी माणसं पाठवली जातात. जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मी आत्ता इथे आले तेव्हा देखील दोन माणसं माझ्या मागावर होती”.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
रोहिणी खडसे म्हणाल्या, मी सरकारच्या लोकांना आवाहन करते की त्यांनी या बहिणीला न्याय मिळवून द्यावा. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी ती लढतेय, तिला मदत करावी. महिला आयोगाने तिची मदत केली असती तर आतापर्यंत हे प्रकरण मिटलं असतं. सुषमा अंधारे यांनी देखील प्रिया फुके यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.