राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईवरील वादग्रस्त विधानाचे आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मुंबईबद्दल जे व्यक्तव्य केलं आहे. ते भौगोलिक दृष्ट्या केले असावे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

“ते भौगोलिक दृष्ट्या बोलले असतील”

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते भौगोलिक दृष्ट्या केलं असेल. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबई हे देशातील सर्वात हायटेक शहर आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची सुरूवात गिरणी कामगारांपासून झाली होती. मात्र, त्यानंतर तिथे अनेक व्यापारी आणि जाती-धर्माचे लोक आलेत. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वांचा हातभार आहे. मुंबई ही सर्वांची आहे, अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली.

हेही वाचा – “राज्यपालांना तुरुंगात पाठवावं का?”; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची १५ विधानं

राज्यपालांकडून वादग्रस्त वक्तव्य

शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.