राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आता या पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलंय. त्यानंतर आता या दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीची दोन गटांत विभागणी झाल्यानंतर पवार कुटुंबातील नेतेदेखील एकमेकांना लक्ष्य करताना दिसतायत. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे टीकेचे स्वरुप आणखी कठोर होताना दिसत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी बैलाचे उदाहरण देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचं नाव न घेता लक्ष्य केलं. ते (२० फेब्रुवारी) अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

” बैल कधी मालकाला…”

“मला एकाने विचारलं दादा बैलाकडे पाहून काय वाटतं. मी म्हणतो बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं. मालक त्या बैलाला वाढवतो. त्याची काळजी घेतो. बैल कधी मालकाला विसरत नाही. तसंच आपण आपल्या आईवडिलांना कधी विसरत नाही. आपण आपल्या काकाला कधी विसरत नाही. आपल्याला ज्या गुरुने शिकवलं त्याला आपण विसरत नाही,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
sharad pawar ncp party candidate to contest from wardha constituency
वर्धा राष्ट्रवादीकडेच, प्रश्न पैशांचाच; पवारांचा पेच अन् उमेदवारांचा जीव टांगणीला…
nilesh Lanke
पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

हेही वाचा >> मोदी तुम्हाला गुरु मानतात.. यावर शरद पवार हसले आणि म्हणाले…

“जो संघर्ष असेल तो…”

रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीवर बोलताना कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. “अलीकडच्या काळात काही लोक विसरून जातात. पण जाऊदेत ज्यांना विसरायचं त्यांना विसरू द्या. आपण सामान्य लोक आज महाराष्ट्राची स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. जो संघर्ष असेल तो आपण एकत्रितपणे करुया,” असंदेखील रोहित पवार म्हणाले.

“नवीन दादा भाजपाची भाषा बोलतायत”

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या मतदारांना भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला निवडून न दिल्यास मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असे अजित पवार काही दिवसांपूर्वी बारामतीच्या मतदारांना म्हणाले होते. या विधानानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना थेट लक्ष्य केलं होतं. “हे बदललेले दादा आम्हाला ओळखता येत नाहीत. पूर्वीचे दादा वेगळे होते. शेतकरी, युवकांवर अन्याय झाल्यानंतर दादा तत्काळ बोलत होते. जे योग्य वाटते, ते रोखठोकपणे मांडणारे दादा मला माहीत होते. मोठ्यांचा आदर करणारे दादा आम्हाला माहीत होते. पण हे नवीन दादा भाजपात गेल्यानंतर त्यांची भाषा बोलू लागले आहेत. हे दादा सत्तेत असून शेतकऱ्यांविषयी, युवकांविषयी बोलत नाहीत. थोरा-मोठ्यांचा मान ते ठेवत नाहीत”, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.

हेही वाचा >> पवार तर मोदींचे गुरू, पण एखाद्याच्या मनातलं हेरणं अवघड, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

बारामतीत बहीण विरुद्ध भाऊ असा राजकीय संघर्ष?

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट), भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीत बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामतीमधील जास्तीत जास्त कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करा, महायुतीच्याच उमेदवाराला मत द्या, असे सांगून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील प्रचाराचा एकाप्रकारे श्रीगणेशाच केला होता. त्यामुळे बारामती मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो.