Rohit Pawar on DGCA : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. बारामती येथे हे विमान लँडिंग होत असताना तांत्रिक अडचणींमुळे कोसळले. परिणामी या विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी डीजीसीएकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, चौकशीचा प्राथमिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही. यावरून अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी”, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांनी डीजीसीएवर ताशेरे ओढत १४ फेब्रुवारी रोजीही एक्स पोस्ट केली होती. त्यात त्यांनी दावा केला होता की डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिला होता. ते म्हणाले, “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्या. याच विषयावर गृहमंत्री अमित शाह, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा विश्वास आहे.”

“पत्रकार परिषद घेतल्यानंतर तपासाला काही प्रमाणात वेग आला असला तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास मात्र होताना दिसत नाही. माननीय गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ देता आला नसेल परंतु DGCA ने वेळ का दिला नाही, हे मात्र समजले नाही. यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणाकडे पाठवली आहे, सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करतच आहोत, राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वचजण देखील यासाठी पाठपुरावा करतील, ही अपेक्षा..!”, असंही रोहित पवार म्हणाले होते.