Rohit Pawar Press Conference : अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. मात्र मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास असमर्थता दाखवली.

त्यानंतर आज रोहित पवार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले. पण तेथेही पोलिसांनी सदर तक्रार दाखल करून घेण्यास वेळ मागितला. त्यामुळे रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले.

दरम्यान, पत्रकार परिषद संपल्यानंतर शेवटी रोहित पवार एका कार्यकर्त्यावर चांगलेच संतापल्याचेही पाहायला मिळाले. “ए…ए…काय वेडा आहे का तू? चल निघ इथून…”, असं म्हणत रोहित पवार हे कार्यकर्त्यावर संतापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित पवार कार्यकर्त्यावर का भडकले?

रोहित पवार यांची आज एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शेवटी रोहित पवार एका कार्यकर्त्यावर चांगले भडकले. झालं असं की, पत्रकार परिषद संपल्यानंतर एका कार्यकर्त्याने रोहित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. मात्र, लगेच रोहित पवार त्या कार्यकर्त्यावर संतापून म्हणाले की, “ए…ए…काय वेडा आहे का तू? चल निघ इथून…, दादा फक्त एकच अजितदादा.”, असं रोहित पवार यांनी म्हटलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातावरून एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे,” असे म्हणत रोहित पवारांनी अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानेही तपासणी केली जावी, अशी मागणी केली. काल मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी DGCA विरोधात एफआयर दाखल करून घेण्यास विरोध केल्यानंतर रोहित पवार आज बारामती येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले. तिथे त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले.

पत्रकार परिषदेत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी DGCA कडून एक अहवाल प्रकाशित झाला. सदर अहवाल आल्यानंतर मी आणि काही पक्षांचे आमदार मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीजीसीएविरोधात एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. मुंबईत एफआयआर दाखल होऊ शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. पण बीएनएस कायद्याअंतर्गत झिरो एफआयआर दाखल करण्याचा मला अधिकार आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. पण तिथे एफआयआर दाखल करून घेतला गेला नाही. त्यामुळे मी आज बारामती येथील पोलीस ठाण्यात आलो आहे.

“आपण यापूर्वीच एफआयआर दाखल करू शकलो असतो, पण खोलात जाण्यासाठी आपण थांबलो होतो. डीजीसीएने २४ फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले गेले. तसेच व्हीएसआर कंपनीचे पाच विमान ग्राऊंड करण्यात आले. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक आहे”, असेही रोहित पवार म्हणाले.