MLA Rohit Pawar On AAIB Report : अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. आज त्यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असून आता त्यांच्या विमान अपघाताचा एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीने प्राथमिक चौकशी अहवाल जारी केला आहे. एएआयबीने प्रसिद्ध केलेला हा प्राथमिक अहवाल २२ पानांचा असून त्यामध्ये विविध निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

एएआयबीने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, VFR (Visual Flight Rules) नियमांचं उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही अशा विविध गोष्टींवर एएआयबीने बोट ठेवलं आहे. तसेच अपघातावेळी हे विमान आधी झाडांवर कोसळलं, नंतर जमिनीवर आणि त्यानंतर विमानाला आग लागल्याचं एएआयबीने म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत आता आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, प्रतिक्रिया देताना एएआयबीच्या प्राथमिक अहवालात रोहित पवारांनी एक चूक दाखवली आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर सविस्तर बोलेल”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

एएआयबीने प्राथमिक अहवालात काय म्हटलं?

-पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नानंतर गो अराऊंड.
-पहिल्या लँडिंगचा प्रयत्न धावपट्टी ११ वर
-दृश्यमानता कमी असताना लँडिंगचा प्रयत्न.
-विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला ५० मीटरवर कोसळलं.
-अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमधून “Ohh Shit” आवाज.
-विमान अपघातावेळी आधी झाडांवर कोसळलं नंतर जमिनीवर.
-अपघातानंतर विमानाला आग लागली.

एएआयबीने कोणत्या गोष्टींवर बोट ठेवलं?

-दुष्यमानता VFR मर्यादेपेक्षा कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न.
-एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.
-बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही.
-हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.
-तसेच CVR/FDR च्या सविस्तर विश्लेषणानंतर अपघाताचं कारण समोर येईल.