अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगर प्रमुख किरण काळे यांना ५१ कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस धाडत माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी व दिवाणी कारवाईचा इशारा दिला आहे. किरण काळे यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत घेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आचार्य आनंदऋषी यांच्या समाधीस्थळी आपण जागा बळकावल्याचे पुरावे सादर करू, आमदार जगताप यांनी त्यासाठी वेळ सांगावी व उपस्थित रहावे, असे प्रतिआव्हान किरण काळे यांनी दिले आहे.

त्याचबरोबर जैन समाजाच्या ट्रस्टच्या भूखंड रक्षणासाठी आपण तुरुंगातही जायला तयार आहोत, आमदार जगताप यांना हवी असलेली ५१ कोटी रुपयांची रक्कम आपण झोळी घेऊन नगरकरांकडून गोळा करू व जगताप यांना देऊ, असेही किरण काळे यांनी सांगितले. नगर शहरातील जैन समाज ट्रस्टची जागा आमदार जगताप यांनी बळकवल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे तसेच यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हा अधिकारी बदलावा अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.

आमदार जगताप यांनी वकील प्रसन्नकुमार जोशी यांच्यामार्फत किरण काळे यांना ५१ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. किरण काळे यांना मिळाली त्यानंतर बोलताना काळे यांनी सांगितले की, माझ्यावर जरूर खटला दाखल करावा, मला तुरुंगात डांबावे. त्याआधी आमदार जगताप, ट्रस्टचे विश्वस्त, स्वयंघोषित भाडेकरू यांनी राष्ट्रसंत आनंदऋषी महाराजांच्या समाधीसमोर पुराव्यानिशी चर्चा करावी. मी खोटा असेल तर लेखी माफीनाफाच काय, मी नाक रगडून माफी मागायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही वेळ व तारीख सांगा, मी यायला तयार आहे.

आमदार जगताप यांनी यापूर्वीही आयटी प्रकरणाच्या संदर्भात १ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. त्याला आपण प्रत्युत्तर दिले होते, परंतु जगताप यांनी खटला दाखल केला नाही. जगताप यांचे हिंदुत्व बेगडी आहे. जगताप यांनी नोटिसीमध्ये ट्रस्टच्या जागेचा भाडेकरूंकडे कायदेशीर ताबा असल्याचे म्हटले आहे. त्यावर काळे यांनी ट्रस्ट, ताबा मारणारा स्वयंघोषित भाडेकरू व जगताप यांच्या संगणमताचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. अन्य सहा भाडेकरी पुढे का येत नाहीत? संबंधित जागेतील चाळ बुलडोझर लावून कोणी पाडली? अध्यक्षांव्यतिरिक्त ट्रस्टचे इतर गप्प का आहेत असाही प्रश्न किरण काळे यांनी उपस्थित केले आहेत.