छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. शिंदे गट आणि भाजपा राज्यात सत्तेत एकत्र आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावर शिंदे गटातील आमदार आक्रमक झालेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी (५ डिसेंबर) भाजपा नेत्यांचा एकेरी उल्लेख करत थेट बाप काढला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून शांतता ठेवल्याचं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय गायकवाड म्हणाले, “राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते त्रिवेदी, आता आमदार प्रसाद लाड आणि नंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बदनामी करण्याची, चिखलफेक करण्याची जणुकाही स्पर्धा लावली आहे की काय असं वातावरण आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते चांगलं काम करत आहेत. दुसरीकडे हे वाचाळवीर संपूर्ण पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.”

“तो प्रसाद लाड पाकिस्तानात जन्माला आला आहे की…”

“तो प्रसाद लाड पाकिस्तानात जन्माला आला आहे की हिंदुस्तानात हेच तपासलं पाहिजे. त्याला शिवरायांचा जन्म कुठे झाला आणि ते वाढले कोठे हेही माहिती नाही. रावसाहेब दानवे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणतो. त्यांनी एवढा मोठा इतिहास घडवला. त्यांनी त्यांच्या बापाला शिवाजी म्हणत एकेरी नावाने कधी बोलावलं होतं का?” असा प्रश्न संजय गायकवाडांनी विचारला.

व्हिडीओ पाहा :

“ते त्यांच्या बापाला उभ्या आयुष्यात एकेरी बोलत होते का?”

गायकवाड पुढे म्हणाले, “राज्यपाल शिवाजी म्हणतात, दानवे शिवाजी म्हणतात. ते त्यांच्या बापाला उभ्या आयुष्यात एकेरी बोलत होते का? आमचा राजा म्हणजे आमच्या सर्वांचा बाप आहे. माझी भाजपाच्या नेतृत्वाला, देवेंद्र फडणीस आणि इतरांना की, त्यांनी इतर सर्व वाचाळवीरांना आवरा. महाराष्ट्र शिवरायांचा अवमान कधीच सहन करत नाही.”

हेही वाचा : “बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून खूप शांतता ठेवली, पण…”

“आम्ही मित्रपक्ष आहोत ते ठीक आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून खूप शांतता ठेवली, पण यापुढे शिवरायांचा अपमान सहन करणार नाही,” असा थेट इशारा गायकवाडांनी भाजपा नेत्यांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sanjay gaikwad criticize bjp leaders over chhatrapati shivaji maharaj issue rno news pbs
First published on: 05-12-2022 at 16:43 IST