एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर सहा महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (०५ फेब्रूवारी) नेवासा येथील एका भाषणादरम्यान, राज्य सरकारवर सडकून टीका केली.
अजित पवार म्हणाले की, नव्या सरकारने बऱ्याच जणांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्या सोबत घेतलं. त्यापैकी प्रत्येकाला मंत्रीपदाचं गाजर दाखवलं होतं. मंत्रीपदाच्या आशेने ४० बंडखोर आमदारांपैकी बऱ्याच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. त्यांना आता त्यांची बायको विचारते या सूटची घडी कधी मोडणार? यांनी नवस केले, अभिषेक करत बसलेत. पण नवस फेडायला अजून मंत्रीपद काही मिळालेलं नाही. मंत्रीपद मिळाल्यावर नवस फेडायला येईन असं म्हणाले होते. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि यांना मंत्रीपद मिळालं नाही.
दरम्यान, अजित पवार म्हणाले की, हे सरकार (शिंदे-फडणवीस) केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक प्रकल्पावर स्थगिती लावली जात आहे. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मतदार संघात आणलेल्या प्रकल्पांवर स्थगिती लावली आहे.
हे ही वाचा >> “टीव्ही लावला की आमच्यातील साहित्य ओसांडून वाहताना पाहू शकता”, साहित्य संमेलनात बोलताना फडणवीसांचं मिश्किल विधान!
माझ्या जिल्ह्यातला २ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेला
अजित पवार म्हणाले की, माझ्या जिल्ह्यात येणारा २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातला नेला. या प्रकल्पाद्वारे २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. राज्यातले अनेक मोठमोठे प्रकल्प परराज्यात पळवले जात आहेत. घटनाबाह्य सरकार केवळ आश्वासन देतंय की दुसरे मोठे प्रकल्प राज्यात येणार आहेत. परंतु तसं होईल असं दिसत नाही. कारण असे प्रकल्प राज्यात आणायला धमक लागते, जी या सरकारमध्ये नाही.