Dhiaj Lingade MLC 20 cr Offer : गेल्या काही वर्षांपासून राज्यात आमदार-खासदार फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांत ६ खासदार आणि १ आमदार फोडण्यात महायुतीला यश आलं. दरम्यान, काँग्रेसमधील आणखी एका आमदाराला २० कोटींची ऑफर शिंदेसेनेकडून आल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण होणार का? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, या संबंधित आमदाराने आता प्रतिक्रिया दिली असून अशी कोणतीही ऑफर आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे सेनेकडून २० कोटींची ऑफर आल्याचा दावा आज संजय राऊत यांनी केला. “माझ्या कानावर आलंय की, लिंगाडे नावाचे आमदार आहेत त्यांना २० कोटी रुपयांची ऑफर आली आहे. काल परवाची गोष्ट आहे. या आमदाराला ऑफर देण्यात आली आहे. तो आमचा आमदार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, चर्चा सुरू असतात, अमुक माणसाला ऑफर देण्यात आली आहे. त्यांना शिंदे गटाकडून २० कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय”, असा दावा राऊतांनी केला.

आमदार धीरज लिंगाडे काय म्हणाले?

“अशी कोणतीही ऑफर मला आलेली नाही. याबाबत मला आज सकाळीच कळालं. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी हे स्टेटमेंट कशाच्या आधारावर केलं, याबाबत आश्चर्य आहे. मला अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. हे वक्तव्य चुकीचं आहे”, असं धीरज लिंगाडे यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, “माझा कोणीशीही संपर्क नाही. मी पदवीधर आमदार आहे. मंत्री-मुख्यमंत्री यांना कामाच्या निमित्ताने भेटत असतो, ते सर्वच भेटत असतात. ऑफर आली तरी मी पैशांच्या ऑफरला बळी पडणारा आमदार नाही. मी काँग्रेसचा आमदार असून काँग्रेसमधूनच काम करतोय.”