scorecardresearch
Live

Raj Thackeray Speech : “असं वाटतं मोदींना सांगावं दर महिन्याला दोन दिवस…”, पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी!

मनसेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम होत असून पहिल्यांदाच मुंबईबाहेर वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत आहे.

raj thackeray mns anniversary
मनसे वर्धापन दिन सोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं आज १६व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सध्याचं राज्यातलं राजकारण याविषयी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं.

गेल्या काही काळात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या भागात दौरे करून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला आहे.

Live Updates
20:15 (IST) 9 Mar 2022

माझ्या राजाचा जन्मदिवस म्हणजे माझा सण आहे. ती कुणाचीतरी फक्त जयंती नाही. तो महाराष्ट्राचा सण आहे. तो सण म्हणून साजरा करायचा आहे. २१ तारखेला सगळ्यांनी धूम धडाक्यानं शिवजयंती साजरी करावी.

20:14 (IST) 9 Mar 2022

२१ मार्चला शिवजयंती आहे. आत्ता तारखेनं साजरी झाली, आता तिथीने आहे. आपली ओळखच मुळात त्यांच्यामुळे आहे. आम्ही मराठी आहोत असं जेव्हा आपण सांगतो, तेव्हा मराठी आहोत म्हणजे मराठी भाषा बोलणारे आहोत. हे मराठी लोक कुठे राहतात. शिवछत्रपती राजा होऊन गेला, त्याच्या भागात आम्ही राहातो. ज्याचा विचार मारण्यासाठी औरंगजेबालाही २७ वर्ष काढायला लागली, त्या शिवाजी राजाच्या भूमीत आम्ही राहातो. तारखेनं करावी की तिथीनं करावी? ३६५ दिवस करा. ज्याला जेव्हा वाटेल, तेव्हा करा. तिथीने का? कारण आपण सगळे सण तिथीने साजरे करतो, तारखेनं नाही.

20:12 (IST) 9 Mar 2022

तुमच्या पोटातली महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची आग आयुष्यात कधी विझून देऊ नका. पुढचे अनेक टप्पे आपल्याला पार करायचे आहेत. पुढच्या काही दिवसांपासून माझा फेरफटका सुरू होईल. अजून अनेकांच्या घरी जायचं आहे. मी ठरवलेलंच आहे, जिथे जाईन, तिथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांकडे जेवणार. पण इतर पक्षांसारखं जात बघून नाही जेवणार. मला जात समजत नाही, मी जात बघत नाही, मला जात कळत नाही, मी जात मानत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्हीही असेच असायला हवेत.

20:11 (IST) 9 Mar 2022

लॉकडाऊनमध्ये तुम्ही जे काम केलंत, त्यासाठी माझ्याकडे आभार मानायला शब्द नाहीत. कोणत्याही करोनाची भीती न बाळगता जिथे अडचण असेल, तिथे मनसैनिक पोहोचला. इतर राजकीय पक्षांचा कुणीही तिथे धावून गेलेला नाही. लोक विश्वासाने मनसैनिकाकडे जात होते.

20:10 (IST) 9 Mar 2022

लोक मुद्दे सोडवण्यासाठी सरकारकडे जात नाहीत, आपल्याकडे येतात. कारण त्यांना वाटतं यामुळे प्रश्न सुटेल. पक्षाला १६ वर्ष झाली. लोक ज्या विश्वासाने आपल्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी येतात, मला वाटतं १६ वर्षातली ही आपली कमाई आहे.

20:09 (IST) 9 Mar 2022

कार्यालय न उघडताही लोकांनी तुम्हाला संपर्क केला पाहिजे की माझं हे काम आहे.

20:09 (IST) 9 Mar 2022

महिलांच्या प्रश्नांविषयी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी, नोकऱ्यांच्या मुद्द्यावर, एसटीविषयीही कुणी बोलत नाही. चिंता कसली, एकमेकांवर छापे टाकतायत. लोकांना काय देणं-घेणं आहे? सत्य परिस्थिती सांगतो, जे लोक तुम्हाला मतदान करतात, त्यांचे आभार माना. कारण त्यातले एक टक्का लोकही तुमच्याकडे काही कामासाठी येत नाहीत. उगीच संपर्क कार्यालय उघडून बसतात. कोण करणार तुला संपर्क? एकटा बसलेला असतो वाट बघत.

20:07 (IST) 9 Mar 2022

किती बोलताय? ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरू. कॅमेरा हटला की नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात? काही वर्षांपूर्वी सभेला गेलो होतो. बाजूला एक नेता बसला होता. सहज काहीतरी बोलत होतो. तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली. मला म्हटला भाषण करून येतो. म्हटलं जा. तिथे लगेच स्टाईल. म्हटलं आत्ता नीट होतास, झालं काय अचानक. तसंच आहे ते. डोळे, भुवया उडवून बोलणं… किती बोलतो? आपण काय बोलतो, कसं बोलतो हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?

20:05 (IST) 9 Mar 2022

राज्यात काय चाललंय काही कळत नाही मला. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, विरोधी पक्ष म्हणतो आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण? उरलो आपण. असे सत्ताधारी-विरोधक बघितले नाहीत कधी. वीट आलाय आता. शिव्या वगैरे काय देतायत, कुठली भाषा आहे. राजकारणात येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत. त्यांना वाटेल राजकारण असंच असतं. हे जर विधानसभेत बोलत असतील, तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेला काय बोलत असतील. तोंडाला येईल ते बोलायचं.

20:04 (IST) 9 Mar 2022

आजचं माझं भाषण म्हणजे टीजर्स, ट्रेलर्स आहेत. पिक्चर २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होईल.

20:03 (IST) 9 Mar 2022

दीड वर्षापूर्वी माझा हात फ्रॅक्चर झाला. चार महिने त्यात गेले. नंतर माझ्या पायाचं छोटं ऑपरेशन झालं. त्याची रिकव्हरी १२ महिने सांगितले. त्यामुळे व्यायाम थांबला. पण खाणं नाही थांबलं. आता तेही कमी केलंय. हल्ली प्रत्येक घरात डॉक्टर झालाय. हे खा, ते खा.. काही औषधंही सांगतात. इतके भयानक असतात ते. हे टाक, ते टाक आणि त्यावर माश्याच्या लघवीचे दोन थेंब टाक… आता ती आणायची कुठून?

20:02 (IST) 9 Mar 2022
ही दोन वर्ष मला विसरताच येणार नाहीत…

ही दोन वर्ष मला विसरताच येणार नाहीत. कित्येकजण उघडपणे फारसे बोलत नाहीत की साहेबांचं जरा वजन वाढलेलं दिसतंय ना?

20:01 (IST) 9 Mar 2022

मला कधीकधी कुणी रील दाखवतात. नवरा बायकोचे रील असतात. हे वेड लागलंय. घरात दोन वर्ष बसून राहिले, कुणी आपल्याला भेटत नाहीत. मग आपलं आपलंच काहीतरी करू. लोकांना तो विनोद वाटतो. पण तो विनोद नाही. तपासून घ्यायला हवं.

20:00 (IST) 9 Mar 2022

सध्या सगळे रशिया-युक्रेन म्हणतायत.. तुमच्या घराचं बघा आधी. युक्रेन राहू द्या बाजूला. लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मुलं अजूनही झूमवर घरून अभ्यास करतायत. खेळायच्या वयात मुलं घरात बसलेत. कित्येकांना असं वाटतं की या दोन वर्षांत काहींना विचारांचे आजार वगैरे जडले असतील.

19:59 (IST) 9 Mar 2022
पालिका निवडणुका दिवाळीनंतरच होतील – राज ठाकरे

१४ एप्रिलला दहावीच्या परीक्षा संपल्या, की सगळे बाहेर जातील. मतं मागायला जाणार कुणाकडे? त्यामुळे तुम्हाला सांगितलं की ३ महिन्यानंतर निवडणुका घेऊ. पण त्या दिवाळीनंतरच होतील.

19:58 (IST) 9 Mar 2022

तुमच्या निवडणुका आहेत किंवा नाहीत, याने लोकांना काही फरक पडत नाही. फरक फक्त निवडणुका लढवणाऱ्यांमध्ये दिसतोय. कित्येकांना निवडणुका लढवण्यातही रस नसतो. नुसतं सांगा, तुला तिकीट देतो, लगेच कमाईला सुरुवातच करतो. या निवडणुका होऊच नयेत, प्रशासक नेमावा म्हणजे दोन्ही बाजूंनी विन विन परिस्थिती. सरकारही हातात, पालिकेचा प्रशासकही हातात. सगळं आम्हीच बघणार.

19:57 (IST) 9 Mar 2022

निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. ती अशी अंगाला स्पर्श करते. वातावरणात यायला लागते. पण मला वातावरणात निवडणूकच दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं की त्यांची मोजणी करायची आहे वगैरे. सगळं झूट. यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, आरोग्याविषयी काही बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली नाही, मला मान्य. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे ढकलतोय. तीन महिने म्हणजे कधी? जून. तेव्हा पाऊस पडत असणार.

19:55 (IST) 9 Mar 2022
निवडणुका लांबणीवर पडणार हे मला माहिती होतं…

आम्ही सगळे वेडे सगळे.. दोन दिवसांपूर्वी कळलं की निवडणुका होत नाहीत. तर सगळे शांत लगेच. आता कुठे पेटवायची? आता काही उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला. निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो.

19:53 (IST) 9 Mar 2022

परवा भाषणात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंविषयी राज्यपाल बोलले. म्हणे इतक्या लहान वयात कसं लग्न झालं? तेव्हा लहानपणी व्हायची लग्नं, तुमचं अजून नाही झालं. नको तिथे बोटं घालायची यांना काय सवय आह कळत नाही मला.

19:52 (IST) 9 Mar 2022

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली की कळतं श्रीमंत आहे. आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं, तुमती माथी भडकवून मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरू आहे यांचा.

19:51 (IST) 9 Mar 2022

ना छत्रपतींनी कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरू होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. त्यातून आम्ही बोध काही घेणार नाही की रामदास स्वामींनी काय लिहिलंय. रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी. त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय त्याहून चांगलं आजपर्यंत मी दुसरीकडे कुठे वाचलेलं नाही.

19:49 (IST) 9 Mar 2022

परवा आमचे राज्यपाल… काही समज वगैरे काही आहे का? मी त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो, तेव्हा बघितलं ना कसं आहे ते? मला वाटलं शेकहँड केल्यावर माझा हात बघायला लागतील. आप का मंगल इथर है, बुध उधर है.. कुडबुड्या ज्योतिषासारखे. शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहिती आहेत का? आपला काही संबंध नसताना नुसतं बोलून जायचं?

19:48 (IST) 9 Mar 2022

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना सॉफ्ट टार्गेट बनवलं गेलं. इतिहास नाही बघायचं. आम्हाला कुणाला इतिहास बघायचा नाहीये. आम्हाला जात बघायची आहे. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला इतिहासात नाही, जातीमध्ये गुंतवून ठेवतायत. बाबासाहेबांनी फार कष्ट घेतले.

19:47 (IST) 9 Mar 2022

मागे मी लता दीदींशी बोलत असताना त्या म्हणाल्या, राज, आमचे बाबा मास्तर दीनानाथ मंगेशकर गेले, घरातली मोठी मुलीग म्हणजे मी होते. १३ वर्षांची. बाकीची भावंडं लहान होती. कधीकधी आमची परिस्थिती अशी असायची की सकाळी जेवणार आहोत की रात्री जेवणार आहोत. कित्येकदा आम्ही सकाळी जेवायचो नाही, माई प्रत्येकाच्या वाटीत कुरकुरे ठेवायची. ते खाऊन आम्ही दिवस काढायचो. दीदींना वाईट काळ आला नसेल. पण त्यांनी कष्ट उपसलेत.

19:45 (IST) 9 Mar 2022

मी तुम्हाला सगळ्यांना, मनसैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना मी धन्यवाद देतो, की याही काळात तुम्ही माझ्यासोबत राहिलात. चढउतार येतच असतात. मी मागेही बोललो होतो. जगात प्रत्येकाला वाईट दिवस आले. एकाच व्यक्तीने कधी वाईट काळ पाहिला नाही, त्या म्हणजे आमच्या लता दीदी. पण त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेत, ते काही सहज झालेलं नाही. काही गोष्टी दैवी असतात, पण ते सहज झालेलं नाही.

19:43 (IST) 9 Mar 2022

पण असे प्रसंग येत असतात, या प्रसंगातून घाबरून न जाता हे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात.

19:42 (IST) 9 Mar 2022

आत्ताचा गजबजाट पाहून मला वाटतंय की मोदींना सांगावं महिन्यातून दोनदा लॉकडाऊन ठेवा. ती शांतता भीतीदायक होती, पण चांगली होती. त्या काळात सकाळी कोकिळा कुहू कुहूऐवजी कोविड-कोविड ओरडतायत की काय असं वाटायला लागलं होतं. त्या काळात भीती होती, पण कुटुंबं जवळ आली. या सगळ्या वातावरणातून आपण पुढे जात होतो. सगळ्या जगावरचं संकट होतं. माझ्यावर, पक्षावर संकटं चालूच आहेत. संकटं येतात, तेव्हा हातात हात घालून येतात, जाताना एकेकटी जातात. त्यामुळे त्यांना जायला वेळ लागतो.

19:39 (IST) 9 Mar 2022

तुमच्या घोषणा बंद करा.. माझं सगळं भाषण संपलं की एकत्र ओरडा…कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू. रस्त्यावर सगळा शुकशुकाट आहे, सगळे घाबरून घरात बसलेत, कुटुंबांना समजत नाहीये की आता काय होणार. सहज स्पर्श करायलाही भीती वाटायला लागली. करोना काळात संशयाचं वातावरण निर्माण झालं. आपण अशी गोष्ट कधीही पाहिली, ऐकली नव्हती. लॉकडाऊन लागल्यानंतर दोन दिवसांनी माझी कुत्री कन्याला घेऊन घराबाहेर बसलो होतो. समोर शिवाजी पार्क मैदान होतं. पण मला फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मी कधीच ऐकली नव्हती.

19:38 (IST) 9 Mar 2022
दोन वर्षात मी कुठेही भाषण केलं नाही – राज ठाकरे

जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…दोन वर्ष मी कुठेही भाषण केलं नाही. मुलाखती दिल्या. कुठे ५ मिनिटं बोललो, पण भाषण केलं नाही. दोन वर्षांपूर्वी जेव्हा आपण आझाद मैदानावर मोर्चा काढला होता, ते माझं तेव्हाचं शेवटचं भाषण. त्यानंतर मी दोन वर्ष कुठे बोललोच नाही. तुम्हीही दोन वर्ष बोललात नाही.. त्यामुळे मी आज वर्धापन दिनाचं भाषण करायचं.. विचार करत होतो की प्रॅक्टिस सुटली तर नाही ना. यापुढची वाटचाल आपण जोरात करू ही आशा देतो..

19:34 (IST) 9 Mar 2022
राज ठाकरेंनी फक्त लढ म्हणावं – बाळा नांदगावकर

मला लोक म्हणतात तुमच्याकडे आमदार-खासदार नाहीत… कसं करणार? मी म्हणतो अशा कित्येक आमदार-खासदारांचे निर्माते आमच्याकडे आहेत. आम्हाला गरज नाही कुणाची. राज ठाकरेंनी फक्त बाहेर पडावं आणि आम्हाला लढ म्हणावं.. आम्ही लढण्यासाठी तयार आहोत – बाळा नांदगावकर

19:33 (IST) 9 Mar 2022

नसीरुद्धीन शाह यांचा एक चित्रपट होता जाने भी दो यारो.. त्यात गाणं होतं हम होंगे कामयाब एक दिन… मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे कमयाब व्हाल आणि ही लढाई जिंकाल – बाळा नांदगावकर

19:31 (IST) 9 Mar 2022

आता फक्त लढायचं नाही, तर जिंकायचंच या भावनेनं सर्व मनसे कार्यकर्ते उतरतील – बाळा नांदगावकर

19:28 (IST) 9 Mar 2022

सोळावं वरीस विरोधकांसाठी धोक्याचं आणि मनसेसाठी मोक्याचं – बाळा नांदगावकर

19:26 (IST) 9 Mar 2022
राज ठाकरे आज काय बोलणार?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Mns 16th anniversary raj thackeray live from pune election strategy future directions pmw

ताज्या बातम्या