भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे न बुजवताच टोल वसुली सुरू ठेवल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज या रस्त्यावरील टोल नाका फोडला. यावेळी मनसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या कार्यकर्त्यांनी यापूर्वी इशारा आंदोलन करुनही प्रशासनाने कारवाई केली नाही, म्हणून आपण अशी आक्रमक भूमिका घेतल्याचं या मनसैनिकांचं म्हणणं आहे.

भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी आज सकाळी फोडला. त्यानंतर काही वेळ घोषणा देऊन हे कार्यकर्ते निघून गेले. काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर श्राद्ध आंदोलन केलं होतं. रस्त्याची दुरुस्ती करावी नाहीतर टोल वसुली बंद करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली होती. मात्र, त्यानंतरही काहीच पावलं उचलण्यात आली नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
भिवंडी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय या रस्त्यावर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आधी इशारा आंदोलन करून प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, खड्डे दुरुस्ती न झाल्याने त्यांनी आज आंदोलन केलं.