अलिबाग- ज्या खाड्यांमध्ये ड्रेझर द्वारे रेती उत्खननात परवानगी दिलेली नाही, त्या खाड्यांमध्ये डूबी हातपाटी द्वारे रेती उत्खननास परवानगी द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिध्दू म्हात्रे यांनी केली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
रायगड जिल्ह्यात डूबी हातपाटी द्वारे रेती उत्खनन सध्या बंद आहे. त्यामुळे या व्यवसायाशी सलग्न असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात डूबी आणि हातपाटीद्वारे रेती उत्खननास परवानगी द्या अशी मागणी वेळीवेळी करण्यात आली आहे. याबाबत हातपाटी रेती उत्खनन करणाऱ्या संस्थांनी जिल्हाप्रशासनाला अनेक निवेदन सादर केली आहेत. मात्र जिल्हाप्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दुसरीकडे ड्रेझरद्वारे रेती उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. ज्या खाड्यामध्ये ड्रेझर द्वारे रेती उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. त्यावगळून इतर खाड्यामध्ये डूबी आणि हातपाटी द्वारे रेती उत्खननास परवानगी द्या अशी मनसेनी केली आहे. अलिबाग तालुक्यातील नवगाव खाडीत हातपाटी द्वारे रेती उत्खननास परवानगी द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या रेती उत्खननामुळे ड्रेझर द्वारे रेती उत्खननावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि हातपाटी कामगारांचे रोजगारही बाधित होणार नाहीत असे म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
