अमित ठाकरेंचे अजित पवार यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी

राज्यपालांचीही घेणार भेट

‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.

‘आशा’ स्वयंसेविकांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेत मासिक मोबदला वाढवण्याची मागणी केली आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

आणखी वाचा- ‘याआधी झालेल्या चुका सुधारण्याची हीच वेळ’, मनसेच्या राज्यपालांकडे महत्त्वाच्या मागण्या

अमित ठाकरेंनी फेसबूक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.

इतर राज्यांत आशा स्वयंसेविकांना दर महिन्याला मिळणारा मोबदला महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांपेक्षा जास्त आहे. आपल्या राज्यातील आशा स्वयंसेविकांना इतका कमी मोबदला का मिळत आहे? तसेच महाराष्ट्रात आशा स्वयंसेविकांची अशी स्थिती का, याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns amit thackeray writes letter to ajit pawar and rajesh tope on asha worker pay nck