Raj Thackeray in Satyacha Morcha: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीप्रणीत विरोधी पक्षांच्या ‘सत्याचा मोर्चा’ची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. या पार्श्वभूमीवर आज मोर्चासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, नागरीक व या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईत फॅसन स्ट्रीट ते मुंबई महानगर पालिका यादरम्यान निघालेल्या मोर्चानंतर पालिका भवनासमोर सर्व विरोधी पक्षांची जाहीर सभा झाली. या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात निवडणूक आयोगावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, निवडणूक मतदार याद्यांमधील घोटाळ्याचे अक्षरश: ढीगभर पुरावेच राज ठाकरेंनी यावेळी सादर केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी यावेळी विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारही दुबार मतदारांची तक्रार करत असतील, तर मग तपास करण्यासाठी अडवलं कुणी? असा सवाल उपस्थित केला. “आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार बोलतायत की याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्षही बोलतोय, कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत. एवढंच नाही, भाजपाचेही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेंचे, अजित पवारांचेही लोक बोलतायत. अरे मग अडवलं कुणी? मग हे निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर जेव्हा निवडणुका होती, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील. सगळं लपवून-छपवून चाललंय, ते कशासाठी?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.

“कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतले ४५०० मतदार आहेत. या मतदारांनी तिथेही मतदान केलं आणि मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं आहे. महाराष्ट्रभर असे लाखो लोक आहेत जे या मतदानासाठी वापरले गेले”, असा दावा करत राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत, याची एक यादीच वाचून दाखवली.

दुबार मतदारांची यादी…

“हे लोक म्हणतात पुरावे कुठे आहेत. मी आज पुरावे आणले आहेत”, असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळी यादीच वाचून दाखवली. “१ जुलैपर्यंतच्या यादीनुसार मुंबई नॉर्थ मतदारसंघात १७ लाख २९ हजार ४५६ मतदार आहेत. त्यापैकी ६२ हजार ३७० दुबार आहेत. मुंबई नॉर्थ-वेस्ट मध्ये १६ लाख ७४ हजार ८६१ मतदार आहेत. त्यात ६० हजार २३१ दुबार मतदार आहेत. मुंबई नॉर्थ इस्टमध्ये १५ लाख ९० हजार ७१० मतदार आहेत. त्यायत ९२ हजार ९८३ दुबार मतदार आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये १६ लाख ८१ हजार ०४८ मतदार आहेत. त्यात ६३ हजार ७४० दुबार आहेत. मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये १४ लाख ३७ हजार ७७६ मतदार असून त्यात ५०५६५ दुबार मतदार आहेत. मुंबई साऊथमध्ये १५ लाख १५ हजार ९९३ पैकी ५५ हजार २०५ दुबार मतदार आहेत. नाशिक लोकसभेत १९ लाख ३४ हजार ३४९ पैकी ९९ हजार ६७३ दुबार मतदार आहेत. मावळ लोकसभेत १९ लाख ८५ हजार १७२ पैकी १ लाख ४५ हजार ६३६ दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७ लाख १२ हजार २४२ पैकी १ लाख २ हजार ०२ दुबार मतदार आहेत. ठाणे लोकसभेत २ लाख ९ हजार ९८१ दुबार मतदार आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

मतदारसंघएकूण मतदारदुबार मतदार
मुंबई उत्तर १७ लाख २९ हजार ४५६६२ हजार ३७०
मुंबई उत्तर-पश्चिम१६ लाख ७४ हजार ८६१६० हजार २३१
मुंबई उत्तर-पूर्व१५ लाख ९० हजार ७१०९२ हजार ९८३
मुंबई उत्तर-मध्य१६ लाख ८१ हजार ०४८६३ हजार ७४०
मुंबई दक्षिण-मध्य१४ लाख ३७ हजार ७७६५० हजार ५६५
मुंबई दक्षिण१५ लाख १५ हजार ९९३५५ हजार २०५
नाशिक१९ लाख ३४ हजार ३४९९९ हजार ६७३
मावळ१९ लाख ८५ हजार १७२१ लाख ४५ हजार ६३६
पुणे१७ लाख १२ हजार २४२१ लाख २ हजार ०२
ठाणे२ लाख ९ हजार ९८१

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांकडून व निवडणूक आयोगाकडून सातत्याने आरोपांचे पुरावे मागितले गेल्याचा उल्लेक केला. त्यासाठी आज आपण पुरावेच घेऊन आलो आहोत, असं म्हणत राज ठाकरेंनी गर्दीत एका उंचवट्यावर ठेवलेल्या गठ्ठ्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवलं. हे सगळे दुबार मतदार असल्याचा दावा यावेळी राज ठाकरेंनी केला.

निवडणुकांत दुबार मतदार दिसला की बडवून काढा – राज ठाकरे

दरम्यान, येत्या निवडणुकांमध्ये जर दुबार मतदार दिसला, तर तिथल्या तिथे बडवून काढा, असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. “जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा. चेहरे कळले पाहिजेत. जर त्यानंतर हे दुबार-तिबारवाले आले, तर तिथेच फोडून काढायचे. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.