काही दिवसांपूर्वी कोंदिवडे गावातल्या दोन मुलींनी रस्त्यावर पडलेल्या छत्रीलाच माईक बनवत रस्त्यावरच्या खड्ड्यांबाबत व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओ करणाऱ्या दोन मुलींनी आणि इतर मुलींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. शाळकरी मुली छत्रीचा माईक करून खड्ड्यांचं रिपोर्टिंग करतानाचा अवघ्या ४७ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. मुलींचं कव्हरेज केवळ कोंदविडे गावापुरतं मर्यादित असलं तरी राज्यभरातील खड्ड्यांनाच त्यांनी वाचा फोडली होती. या मुलींशी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संवाद साधला.
रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावातल्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रायगड जिल्ह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत रिपोर्टिंग करून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हायरल झालेल्या मुली राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ आज आल्या. यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली. कोण कोणत्या वर्गात शिकतं याची माहिती घेतली. त्यांच्या कौटुंबिक स्थितीची माहिती घेतली. गावाची माहिती घेतली.
मोठ्या झाल्यावर रिपोर्टर होणार का? राज ठाकरेंनी मुलींशी साधला संवाद
राज ठाकरेंनी या मुलींना काही प्रश्न विचारले. तुम्ही मोठं होऊन कोण होणार? रिपोर्टर होणार आहात का? असं राज ठाकरे यांनी या मुलींना विचारलं. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. एकीने स्टेनो होणार असल्याचं सांगितलं. दुसरीने युट्यूबर तर तिसरीने स्केच आर्टिस्ट होणार असल्याचं राज ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना तुम्ही अभ्यास करताय ना? असा दुसरा प्रश्न केला. त्यावर आम्ही अभ्यास करतो. पण आमचे तीन ते चार तास असेच वाया जातात असं त्या म्हणाल्या. व्हिडीओ केल्यापासून अभ्यास होत नाहीये. अनेक लोक भेटायला येत आहेत. तीन ते चार तास मुलाखत देण्यातच जात आहेत, असं या मुलींनी राज ठाकरेंना सांगितलं.
रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं स्पेशल रिपोर्टिंग करणाऱ्या रायगडच्या शाळकरी मुलींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रायगडच्या कर्जत तालुक्यातल्या नेहा आणि ज्योत्स्ना या दोन शाळकरी मुली शिवतीर्थवर पोहोचल्या आहेत. कोंदिवडेमधल्या रस्त्याची दुरवस्था दाखवणारा या मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओनंतर प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचं कामही सुरू केलंय. याच व्हायरल गर्ल्स आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला.
