लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला, म्हणजेच पर्यायाने देशात एनडीएला आणि राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. सोशल मीडियावर ट्रोलिंगही झालं. निकालांनंतर राज्यात महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निकालांनंतर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेची नेमकी काय भूमिका असेल? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. याबाबत राज ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर दोनच शब्दांत भाष्य केलं.

मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच, लोकसभा निवडणुकांचे निकाल व आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचं धोरण यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तरं दिली.

निवडणुकीसाठीच बैठकीचं आयोजन

दरम्यान, यावेळी बैठकीचं आयोजन आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेच करण्यात आल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच, या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम, उपक्रम दिले असून त्याचा आढावा घेऊन ते पुन्हा मला भेटतील, असं राज ठाकरे यावेळी माध्यमांना म्हणाले.

“कितीही आवडता नेता असला तरी…”

यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या चालू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या मुद्द्यांवर ते भाष्य करत होते. “या सर्व समाजांना एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. इतकी वर्षं मी भाषणांमधून सांगत आलोय की जातीपातीतून काहीही होणार नाही. सगळे पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं मिळवतील. हे लोक भोळसटपणे मतं देतीलही. काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत होती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की हे सगळं प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने काही शाळकरी मुलींची प्रतिक्रिया घेतल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या शाळकरी मुली त्यांच्या वर्गात भिन्न जातींच्या मैत्रिणींमध्ये कशा प्रकारे कटुता निर्माण झाली आहे. याबाबत सांगत आहेत. या व्हिडीओचा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी भाष्य केलं.

“महाराष्ट्रात हे असं विष कधी नव्हतं. जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा आवडणारी व्यक्ती असेल तरी जर विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? यावरून उत्तर प्रदेश-बिहारसारखाच हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल”, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंची टीका आणि राज ठाकरेंचं उत्तर

दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून राज ठाकरेंना ‘बिनशर्ट’ पाठिंबा म्हणत टोला लगावला असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनीही मनसेवर ‘सुपारीबाज पक्ष’ म्हणून टीका केल्याबाबत यावेळी राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींनी हा प्रश्न विचारताच तो पूर्ण होण्याआधीच राज ठाकरेंनी लागलीच “ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या” असं म्हणत या टीकेला फारसं महत्व देत नसल्याचं आपल्या प्रतिक्रियेतून दर्शवलं.

राज ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवणार?

लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेला मनसेची नेमकी भूमिका काय? याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलं आहे का? अशी विचारणा केली. त्यावर राज ठाकरेंनी “आत्ताच सांगू?” अशी विचारणा केली. यासंदर्भात अद्याप मनसेकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

“वरळीत चिखल, पण तरीही कमळ फुलू देणार नाही”, आदित्य ठाकरेंचा भाजपाला खोचक टोला

संजय राऊतांच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलेली टीका सध्या चर्चेत आली आहे. सत्ताधाऱ्यांचं नाव न घेता “काही लोकांना बांबू लावायची वेळ आली आहे”, असं विधान संजय राऊतांनी केलं. त्याबाबत विचारणा केली असता राज ठाकरेंनी फक्त “लावा म्हणावं”, असं म्हणत प्रतिक्रिया तिथेच संपवली.